ठाणे जिल्हा  file photo
ठाणे

ठाणे विधानसभेत मराठा मतदारांची भूमिका निर्णायक

पुढारी वृत्तसेवा
ठाणे : दिलीप शिंदे

मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यभर पेटला असून त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसल्याचे दिसून आले आहे. आरक्षणाचा प्रश्न आजही धगधगत असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा मतदारांची भूमिका महत्वाची ठरू शकते.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे विधानसभा मतदारसंघात सुमारे एक लाख १० हजार मराठा मतदार आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मराठा फॅक्टर हा निर्णायक भूमिकेत असल्याने ठाण्याच्या आमदाराचे भवितव्य ठरवू शकतो, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. ठाणे विधानसभा मतदार संघावर काँग्रेस, शिवसेना आणि आता भाजपचे वर्चस्व आहे. १९६२ ते १९७२, १९८० व १९८५ या पाच निवडणुका काँग्रेसने जिंकल्या होत्या. आणीबाणीनंतर १९७८ ते ८० या काळात ठाण्याची जागा जनता पार्टीन जिंकली होती. १९९० पासून ठाण्यातील चित्र बदलले आणि ठाण्यावर भगव्याचे राज्य सुरु झाले.

१९९० ते २०१४ पर्यंत सलग पाच वेळा शिवसेनेचा भगवा झेंडा ठाण्यात फडकत राहिला. मात्र २०१४ मध्ये युती तुटली आणि भाजपचे संजय केळकर यांनी शिवसनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. २०१९ मध्येही पुन्हा ठाण्यात भाजपचे कमळ फुलले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत ठाण्यावर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून दावा केला जात असला ठाण्याची विधानसभा सलग तिसऱ्यांदा भाजप लढेल. त्यामुळे भाजपमधील अन्य काही इच्छुकांकडून उमेदवारीकरिता प्रयन्त सुरु झाले आहेत.

एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे सर करण्यासाठी महायुती, महाविकास आघाडी आणि मनसेने जोरदार तयारी सुरु करीत जातीय समीकरणावरही गणित मांडण्यास सुरुवात केली आहे. कारण राज्यात मराठा आरक्षण, धनगर आरक्षण तसेच ओबीसी, आदिवासी आरक्षण बचाव आंदोलने सुरु असून त्याचे पडसाद नक्कीच विधानसभेच्या निवडणुकीत उमटणार आहेत.

त्यामध्ये प्रामुख्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्रस्थानी राह शकतो. मराठा आरक्षणाचा वणवा राज्यभरात पेटला असून त्याची झळ लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सहन करावी लागली आहे. विधानसभा निवडणुकीतही आरक्षणाचा मुद्दा प्रमुख राहणार असल्याने विधानसभेनिहाय मराठा मतदारांचा विचार सुरु झाला आहे.

अशी आहे आकडेवारी

कॉस्मोपॉलिटन मतदार संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे विधानसभेची मतदार संख्या सुमारे ३ लाख ९३ हजार असून त्यापैकी सुमारे ३ लाख १६ हजार हिंदू आणि ३२ हजार मुस्लिम मतदार आहेत. सुमारे १३ हजार जैन मतदार, ७ हजार खिचन, ५ हजार शीख, बौद्ध मतदारांची संख्या सुमारे २० हजारपिक्षा अधिक असल्याचे दिसून येत आहे. ठाण्यातील एकूण मतदारांमध्ये सर्वाधिक सुमारे १ लाख १० हजार मतदार हे मराठा असून ३५ हजार ब्राह्मण मतदार आहेत. उत्तर भारतीय मतदारांची संख्या ४७ हजार असून दक्षिण भारतीय मतदार १९ हजार ३०० च्या आसपास आहेत.

जरांगे पॅटर्न इफेक्ट देणार?

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला वारंवार इशारा देत सर्व मराठा समाजाला आरक्षणासाठी लढण्याचे आवाहन केले. या पार्श्वभूमीवर मराठा मतदार है ठाण्याच्या निवडणुकीला कशी कलाटणी देऊ शकतील, याबाबतची रणनीती मराठा सकल मोर्चा, मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकाऱ्यांकडून आखली जात असल्याने सगळ्याच पक्षांचे चिंता वाढली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT