ठाणे : ठाण्याच्या उपवन तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 10 वर्षीय मुलाला तलावाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
पोहायला गेलेल्या मुलांच्या मृत्यूची हि नजीकच्या काळातील तिसरी घटना असल्याची माहिती उपलब्ध होत आहे. सदरची घटना रविवारी दुपारी 1:33 वाजण्याच्या सुमारास घडली. राज भास्कर चाबूकस्वार (10) असे त्या मृतक मुलाचे नाव आहे.
रविवारी (दि.24) रोजी दुपारी ठाण्याच्या उपवन तलाव, पालाई देवी मंदिर जवळ, उपवन, ठाणे (प.) या ठिकाणी राज भास्कर चाबूकस्वार (10) रा. पाईपलाईन, भीमनगर, वर्तकनगर हा मुलगा तलावामध्ये पोहण्यासाठी गेला असता, त्याला तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो तलावामध्ये बुडाला होता. घटनास्थळी वर्तकनगर पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांनी बुडालेल्या मुलाचा मृतदेह तलावातून शोधून काढला. त्याला रुग्णवाहिकेद्वारे ठाणे जिल्हा रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी करत मुलाला मृत घोषित केले. मृतदेह वर्तकनगर पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांच्या सुपूर्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली.