बदलापूर : मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका २२ वर्षीय तरुणीवर दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना बदलापुरातील शिरगांव भागात घडली आहे. या प्रकरणी तरुणीला गुंगीचे औषध देणारी मैत्रीण आणि बलात्कार करणारे संतोष रुपवते आणि शिवम राजे या दोघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली.
बदलापूर पूर्व भागात राहणाऱ्या पीडित तरुणीची काही दिवसांपूर्वी शिरगांव येथे राहणाऱ्या भूमिका मेश्राम या तरुणीसोबत ओळख झाली होती. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी भूमिका हिने आपल्या वाढदिवसासाठी पीडित तरुणीला तसेच तिच्या दोन मित्रांना आपल्या घरी बोलावले. मात्र पार्टीदरम्यान भूमिकाने पीडित तरुणीच्या पेयात गुंगीचे औषध टाकले होते. त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत असलेल्या तरुणीवर तरुणीसोबत तिच्या घरी आलेल्या इतर दोन मित्रांनी सामूहिक बलात्कार केला.
मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आपली मुलगी घरी परत न आल्याने तिच्या पालकांनी भूमिकाला संपर्क केला असता तुमची मुलगी मद्य प्राशन करून येथे पडल्याचे तिने सांगितले. त्यामुळे पालकांसोबत घरी परतलेल्या पीडित तरुणीला शुद्ध आल्यानंतर आपल्यावर बलात्कार झाल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने या प्रकरणी आपले पालक आणि पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय चाचणी केली असता तरुणीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न होताच, तरुणीला गुंगीचे औषध देणारी मैत्रीण भूमिका मेश्राम, सातारा येथून आलेला शिवम राजे (२२) आणि संतोष रुपवते (४०) या तिघां विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली.