डोळखांब : दिनेश कांबळे
शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस टंचाई उग्ररूप धारण करत असल्याचे चित्र दिसते. कारण तालुक्यात असलेल्या पाटबंधारे खात्याच्या सहा धरणातील पाणी देखील आटले असून मोठ्या प्रमाणात धरणात गाळ साचला असल्याचे पहायला मिळते. तर जलजीवन मिशन योजनेची कामे थांबली असून पुढील तीस वर्ष तालुक्यात नवीन पाणी योजना साकारणार नाहीत हा शासनाचा नियम आहे.
धरणांच्या शहापूर तालुक्यात तानसा, वैतरणा, भातसा, मध्यवैतरणा ही शहरांना पाणी पुरवठा करणारी मोठी जलाशय आहेत. तर तालुक्यात पाटबंधारे विभागाची डोळखांब, जांभे, मुसई, आदिवली, खराडे, वेहळोली हे लघुबंधारे आहेत. जांभे धरणाची साठवण क्षमता 4.88 ऐवढी असुन सद्या 2.08 दशलमी शिल्लक पाणी साठा आहे. मसुई धरणाची साठवण क्षमता 3.80 येवढी असतांना 1.70 दशलमी येवढा साठा शिल्लक आहे. आदिवली धरणाची पाणी साठवण क्षमता 2.03 येवढी आहे. मात्र सद्या 0.373 येवढा साठा आहे. खराडे धरणाची 2.25 येवढी साठवण क्षमता असतांना 0.399 येवढा साठा सद्यस्थितीत शिल्लक आहे.
डोळखांब धरणाची साठवण क्षमता 4.23 दलघमी असतांना सद्या 1.325 साठा अस्तित्वात आहे. तर वेहळोली धरणात 1.11 दलघमी साठा शिल्लक आहे. याचाच अर्थ या प्रत्येक धरणात सतरा ते अठरा टक्के येवडा पाणी साठा मार्च अखेर पर्यंत शिल्लक आहे. तर धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्याचे दिसते. भविष्यात या धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घ्यावे लागणार असुन धरणांची उंची व खोली वाढवावी लागणार आहे. तरच पाणी साठवण क्षमता वाढली जाईल आणी पाणी टंचाईवर पर्यायी मार्ग काढता येईल.
त्यामुळे शहापुर तालुक्यात 110 ग्रामपंचायत हद्दीतील गाव पाड्यात मे अखेर पर्यंत दरवर्षी पेक्षा मोठ्याप्रमाणात पाणी टंचाई निर्माण होणार असुन अंदाजे 42 टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. सद्यस्थितीत 28 टँकरने पाणी पुरवठा सुरू असल्याची निर्वाळा पंचायत समिती पाणी पुरवठा विभाग देत असला तरी बर्याचवेळा टंचाईग्रस्त गाव पड्यात टँकर पोहचत नसून भातसा नदीवरील पुलाचे बाजुला झुडपात काही टँकर विनाकारण उभे असलेले पहायला मिळतात.याकरिता टंचाई बाबतचे योग्य नियोजन व समन्वय नसल्याचे पहायला मिळते. सद्या तालुक्यात जलजीवन मिशन योजनेची 197 येवढी काम असून कामांची मुदत संपली असतांना देखील ही कामे संथगतीने सुरू आहेत. तसेत कामांचे दर्जा बाबत साशंकता आहे. कारण अंदाजपत्रकानुसार काम सुरू नाहीत. वर्षभर ठेकेदारांना बिल नाहीत. बोटावर मोजण्या इतकी काम सोडली तर एकही योजना प्रत्यक्षात पुर्ण नाही. तर थेंबभर देखील पाणी नागरिकांना अजून मिळालेले नाही. विशेष म्हणजे यापैकी 97 योजना भावली पाणी योजनेच्या स्रोतावर अवलंबून आहेत. मात्र या योजनेची परिस्थिती देखील जलजीवन योजने पेक्षा वेगळी नाही.
तर सन 2004 रोजी भारत निर्माण, जल स्वराज्य, राष्ट्रीय पेयजल या सारख्या आलेल्या दोनशे पाणी योजना आज देखील कागदावर च पुर्ण झाल्याचे पाहायला मिळते.प्रत्यक्षात नागरिकांना पिण्याचे पाणी मिळाले नाही.तरी सुद्धा दरवर्षी या योजना दुरूस्तीवर खर्च झाल्याचे कळते.असे असतांना टँकरने पाणी पुरवठा करने, नवीन योजना तयार करने, जुन्या योजना दुरूस्ती करने बोअरवेल बसवणे या कामांचा दरवर्षी पंधरा ते विस कोटींचा टंचाई आराखडा तयार केला जातो.
येवढा मोठ्याप्रमाणात पाणी समस्येवर खर्च होत असतांना देखील शहापुर तालुक्याचे माथी कायमची पाणी टंचाई का , का तालुक्याला टँकरवर अवलंबुन रहावे लागते हा तितकाच संशोधनाचा विषय आहे.