डोंबिवली : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटी, जीवन आधार सामाजिक संस्था, एस. आर. एस. सर्व्हिसेस आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली हेरिटेज यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.15) जागतिक पांढरी काठी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाला उपस्थित तब्बल 100 अंध बांधवाना पांढऱ्या काठ्यांचे वितरण करण्यात आले.
समाजामध्ये पांढऱ्या काठीबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी इनसाईट फॉऊंडेशनचे हेमंत पाटील व अध्यक्ष अरविंद नेरे यांच्या पुढाकाराने अंध बांधवांची रॅली प्र. के. अत्रे ग्रंथालयाकडून गणेशमंदिर मार्ग ते सावरकर उद्यान अशा मार्गाने काढण्यात आली. या रॅलीमध्ये रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटीचे अध्यक्ष रो. संजय मांडेकर, सेक्रेटरी रो. आशिष देशपांडे, जीवन आधार संस्थेचे अध्यक्ष उमेश चव्हाण, सेक्रेटरी राहूल कराडकर, एस. आर. एस. सर्व्हिसेसचे डायरेक्टर संतोष चपटे, रमेश प्रजापती, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली हेरिटेजचे अध्यक्ष रो. दीपक ठक्कर, सहभागी झाले होते. या सर्वांनी रॅलीत सहभागी झालेल्या अंध बांधवाना मार्गदर्शन केले. त्यानंतर काठी वाटपाचा कार्यक्रम सावरकर उद्यानात पार पडला.
याप्रसंगी व्हिजन इनसाईट फॉऊंडेशनच्यावतीने अलका पाटील यांच्या स्मरणार्थ (Valuable Humanitarian Service Award - 2024) हा पुरस्कार जीवन आधार संस्थेचे उमेश चव्हाण, राजयोग फॉउंडेशनचे डॉ. राहूल घाटवाळ, गणेश मंदिर संस्थान व केळकर कॉम्प्युटर्सचे राजीव केळकर यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला 100 हून अधिक अंध बांधव उपथित होते. या प्रसंगी व्यासपिठावर प्रमुख अतिथी प्रकाश हिंगणे, रो. संजय मांडेकर, संतोष चपटे, रो. दीपक ठक्कर यांच्या हस्ते अंधांना काठ्यांचे वाटप करण्यात आले. उमेश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.