डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील कल्याण रोडला असलेल्या घर्डा सर्कल या शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या कामाला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने वेग दिला आहे.
सर्कलच्या (आयलॅन्ड) मध्यभागी उभारण्यात येणाऱ्या या पुतळ्याच्या उभारणीसाठी शासनाने महानगरपालिका क्षेत्रातील मुलभूत सोयी आणि सुविधांतर्गत अनुदानातून मिळालेला 1 कोटी 44 लाख 99 हजार 552 रूपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे. येत्या 17 मार्चला शिवजयंती दिनी पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असल्याने कामाला गती देण्यात आली आहे.
गेल्या वर्षी घर्डा सर्कलवर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारणीच्या कामासाठी आवश्यक प्रक्रिया करून केडीएमसीने या कामाचे आदेश दिले. मुंबईच्या बांद्रा येथील मेसर्स एन. ए. कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला पुतळा उभारणीचे काम देण्यात आले आहे. या संदर्भात आयुक्त आणि लेखा विभागाला हा प्रस्ताव माहितीस्तव सादर करण्यात आला आहे. दीड वर्षांपूर्वी एमआयडीसीच्या घर्डा परिसरात सीमेंंट काँक्रीटचा रस्ता अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला होता. या रस्त्याच्या काही भागाची तोडफोड करून घर्डा सर्कलचे वाहतूक बेट (आयलॅन्ड) तोडून तेथे पुतळा उभारणीचे काम जाळ्या लावून सुरू करण्यात आले आहे. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीच्या प्रवेशद्वावर घर्डा सर्कल येथे शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची उभारणी करण्याची घोषणा केली होती. या आश्वासनाची पूर्तता केली जात आहे. या चबुतऱ्यासह पुतळ्याच्या उभारणीसाठी शासनाच्या विविध विभागांच्या परवानग्या घेण्याची कामे संबंधित ठेकेदार आणि महानगरपालिकेकडून सुरू असल्याचे केडीएमसी सूत्रांकडून सांगण्यात आले.
डोंबिवलीचे प्रवेशद्वार असलेल्या घर्डा सर्कलला बहुतांशी रस्ते जोडले आहेत. त्यामुळे शहरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांची सकाळ-संध्याकाळ या सर्कलवर मोठी गर्दी असते. शहराच्या प्रवेशद्वारावरील वाहनांची वाढती गर्दी आणि भविष्यात वाढणारी संख्या लक्षात घेऊन घर्डा सर्कलच्या वाहतूक बेटाचा आकार कमी करण्याचा किंवा ते काढून टाकण्याच्या दृष्टीने विचार करावा, याकडे कोळसेवाडी वाहतूक नियंत्रण शाखेने दोन वर्षांपूर्वी केडीएमसीचे लक्ष वेधले होते. या मागणीचा विचार न करता सर्कलवर शिवरायांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. उभारणीला आमचा विरोध नाही. वाहतुकीला अडथळा येऊ नये यासाठी पुतळा याच सर्कलजवळील कॅ. विनयकुमार सचान स्मारकाजवळ असलेल्या हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंंकुलातील मोकळ्या जागेत उभारण्याची अनेक डोंबिवलीकरांनी मागणी आहे. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे या मागण्यांकडे कुणी लक्ष देत नसल्याची खंत अनेक जाणकार डोंबिवलीकरांनी व्यक्त केली.
घर्डा सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणीचे काम सुरू आहे. पुतळा उभारणीसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक मंजुरीच्या प्रक्रिया पार पाडल्या आहेत. शासनाच्या विविध विभागांच्या आवश्यक परवानग्या घेण्यात येत आहेत. शासनाकडून मिळालेल्या मुलभूत सोयी आणि सुविधांच्या अनुदानातून हे काम केले जात असल्याचे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी सांगितले.