डोंबिवली : मेल-एक्स्प्रेसमध्ये रात्रीच्या सुमारास झोपलेल्या प्रवाशांच्या उशाखालील रोख रक्कम आणि सोन्याच्या ऐवजांसह सामान लांबविणार्या एका सराईत चोरट्याला कल्याण आणि मुंबईच्या लोहमार्ग क्राईम ब्रँचने चिपळून येथून अटक केली आहे. इंदोर-दौंड एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्या एका वृद्धेच्या उशाखालून 34 लाख 98 हजार रूपयांचा ऐवज असलेली पर्स या चोरट्याने शुक्रवारी लांबविली होती. पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम राबवून या चोरट्याला अटक केली. महेश घाग उर्फ विक्की (32) असे सराईत चोरट्याचे नाव असून तो मूळचा चिपळूण येथील रहिवासी असल्याचे तपासात उघड झाले आहे.
इंदोर-दौंड एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्या महिलेचा 34 लाख 98 हजारांचा ऐवज चोरी केल्यानंतर महेश घाग उर्फ विक्की चिपळूण येथे पळून गेला होता. लोहमार्ग क्राईम ब्रँचने अवघ्या 12 तासांच्या आत चिपळूण येथून त्याला अटक केली. गुरूवारी रात्रीच्या सुमारास वृध्द महिला इंदोर-दौंड एक्स्प्रेसने प्रवास करत होती. या महिलेकडील पर्समध्ये रोख रक्कम आणि सोन्याचा ऐवज असा एकूण 34 लाख 98 हजारांचा ऐवज होता.
या महिलेने पर्स उशीखाली ठेवली होती. शुक्रवारी सकाळी एक्स्प्रेस कल्याण रेल्वे स्थानकात आली तेव्हा उशीखाली ठेवलेली पर्स गायब असल्याचे प्रवासी महिलेच्या लक्षात आले. डब्यात सर्वत्र शोध घेऊनही पर्स कुठेही आढळून आली नाही. त्यामुळे भयभीत झालेल्या महिलेने कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
स्थानिक पोलिसांसह वरिष्ठांच्या आदेशांनुसार क्राईम ब्रँचच्या कल्याण आणि मुंबई युनिटचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुधाकर शिरसाठ, राजेंद्र रानमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ तपास चक्रांना वेग दिला. कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेर्यात लोहमार्ग पोलिसांच्या रेकॉर्डवरील महेश घाग हा चोरटा मेल-एक्स्प्रेसमधून उतरून रेल्वे स्थानकाबाहेर जाताना आढळून आला.
खासगी गुप्तहेरांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार हा चोरटा विक्की घाग असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक माहितीच्या आधारे माग काढत क्राईम ब्रँचने विक्कीला चिपळूणमधून उचलले. चौकशी दरम्यान त्याने पर्स लांबविल्याची कबूली दिली. शिवाय चोरलेली 34 लाख 98 हजाराची पर्स देखिल त्याने क्राईम ब्रँचच्या ताब्यात दिली. पर्समध्ये मोती हार, हिर्याच्या बांगड्या, रिंग, सोन्याचे घड्याळ, सोनसाखळ्या, सोन्याच्या रिंग, रोख रक्कम असा ऐवज होता. आपला चोरीस गेलेला ऐवज जसाच्या तसा परत मिळाल्याबद्दल प्रवासी महिलेने पोलिसांचे कौतुक केले.