ठाणे : पेहलगामवर झालेला हल्ला हा देशावरचा हल्ला आहे, जे व्यक्ती, जे कुटुंब यात शहीद झाले त्यांनी देशासाठी ही किंमत दिलेली आहे. यामध्ये धर्म,जातं,पात, भाषा या गोष्टी आणायच्या नाहीत.कशाचीही अपेक्षा न करता सर्वांना एकत्र यायला हवं हे मी जाहीरपणे सांगितलं. त्यामुळे देशाचे प्रधानमंत्री आणि अन्य सहकारी जे काय उपाय करत असतील त्याला आमचे पूर्ण सहकार्य राहील अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. यासंदर्भात आमच्या काही सहकाऱ्यांनी विशेष अधिवेशनाची मागणी देखील केली आहे. आपण सर्व एक आहोत हे दाखवण्यासाठी विशेष अधिवेशन अत्यंत उपयुक्त ठरेल अशी मागणी देखील शरद पवार यांनी केली आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात भव्य तुळजापूर भवानीचे मंदिर उभारले असून मंदिरातील तुळजाभवानीच्या मूर्तीची प्रमाणप्रतिष्ठा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आणि माजी मंत्री अनिल देशमुख या सोहळ्याला उपस्थित होते. या प्रसंगी शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अनेक महत्वाच्या विषयांवर आपले मत व्यक्त केले.
आजचा दिवस अक्षय तृतीयेचा आजचा दिवस, म्हणजे मोठा मुहूर्त. आजच्या दिवशी मंदीर खुले होणे चांगली गोष्ट आहे. मंदीरात प्रवेश केल्यावर समाधान वाटेल असं मंदीर जितेंद्र आव्हाड यांनी बांधले असून आव्हाड यांचे यावेळी पवार यांनी विशेष कौतुक केले. काही लोकं म्हणतात मी अशा कार्यक्रमांना जात नाही. हे अर्ध सत्य आहे हे आज सर्वाला कळलं असेल.मी लहान असल्यापासून कित्येक पूजा केल्या आहेत. आज श्रद्धेने मी सहपरिवार पूजा केली असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
या सोहळ्याला उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील पेहेलगामवर झालेल्या हल्ल्यावर आपली प्रतिक्रिया देताना पाकिस्तानला याचे उत्तर देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. जो हल्ला पाकिस्तान केला त्याला उत्तर देणे गरजेचे आहे.पंतप्रधानांसोबत सर्वजण आहेत ते लवकर यावर एक्शन घेतील.पेहेलगाम येथे चौकी पाहिजे होती, तिथे लोकं येतात. या हल्ल्यातून विसंवाद दिसून आला जो दिसायला नको याबाबत जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. जयंत पाटील यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली आहे. पाकचे नेतृत्व कमकुवत आहे. त्यामुळे धर्माचा आधार घेवून नागरिकांना चिथवलं जात आहे. भारताने डिप्लोमेटीक पद्धतीने हे सर्व घेतले पाहिजे. पाकवर हल्ला करून त्यांना धडा शिकवला पाहिजे असे मत असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या सध्या राजकीय चर्चा सुरु असताना शरद पवार यांनी देखील यासंदर्भात आपले मत व्यक्त करत दोन कुटूंब एकत्र आले तर आनंदच आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र या पवित्र कार्यक्रमात राजकीय प्रश्न आणू नका अशी सूचना देखील शरद पवार यांनी यावेळी प्रसार माध्यमांना केली.
सुमारे दोन टन काळ्या पाषाणाचा वापर या मंदिरासाठी करण्यात आला आहे. ३३ फुटांचा कलश आणि त्यापुढे नवग्रह प्रवेश कलश,२६ स्तंभ, २० गजमुखांची आरास, मंदिरासमोर हवन कुंड,१०८ दिव्यांची दीपमाळा,अशा अनेक कलाकुसरीने हे मंदिर साकारले आहे. हेमाडपंती शैलीतील हे मंदिर असून पाषाणा व्यतिरिक्त अन्य कोणत्याच साधनांचा वापर हे मंदिर उभारताना करण्यात आलेला नाही. त्यामुळे किमान ५०० वर्ष या मंदिराला काहीच होणार नसल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.