डोंबिवली : बजरंग वाळुंज
जम्मू-काश्मिरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला, यात तिघा डोंबिवलीकरांचा समावेश आहे. मात्र या निष्पाप जीवांचा बळी घेण्यामागे कोण आहेत ? शत्रू राष्ट्राचे मनोधैर्य वाढविण्याला कारणीभूत कोण आहेत ? असे अनेक सवाल उपस्थित करत मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील एक्स ट्विटवर पोस्टद्वारे राजकारण्यांवर हल्लाबोल केला आहे.
सध्या देशात देशभक्त, देशद्रोही, हिंदू-मुसलमान यावर सरसकट व्यक्त होणे व त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचे प्रकार सुरू आहेत. परिणामी आपला देश सामाजिक दृष्ट्या पोकळ होत चालला आहे. याची पुर्णतः जाणीव अतिरेक्यांना झालेली आहे. हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या नादात आपल्याच देशातला सामाजिक सौहार्द संपवून अजून एक पाकिस्तानी विचार या देशात आपण निर्माण करत आहोत का ? यावरही आपण विचार करणे आवश्यक असल्याचे मत राजू पाटील यांनी या पोस्टवर नोंदविले आहे. ज्याअर्थी ते नराधम निष्पाप जीवांचे बळी घेताना धार्मिक शेरेबाजी करत आहेत व आपल्या भावना भडकविण्याचे काम करत आहेत त्याअर्थी त्यांना हे पक्के माहित आहे की जे काम हजारो गोळ्या करू शकत नाहीत तेच काम तुमच्या व आमच्या भावना भडकावून व धर्माचे विष कालवून ते सहज करू शकतात. कारण सध्याच्या राजकारणाने धर्माच्या नावाची अफूची गोळी सर्वांनाच दिली आहे.
यामुळेच जातीय दंगे भडकतील व हजारो निष्पाप जीव जातील अशी परिस्थिती सध्या आपल्या देशात आहे हे शत्रू जाणून आहे. म्हणूनच ते हरामखोर हे सर्व करत आहेत. आता आपण विचार करायचा आहे की ही परिस्थिती का आली ? आता आपण ठरवायचे आहे की जे त्या नराधमांना पाहिजे ते करायचे की आपापल्या सत् सद् विवेक बुद्धीचा वापर करून या फुटीरतावाद्यांचे मनसुबे मोडून काढायचे ? येणारा काळ कठीण असेल. अशावेळी देशात सर्व समाजात देशभक्तीची भावना व सलोखा कसा राहील हे पाहणे सरकारचे व सर्वच राजकीय पक्षांचे काम आहे. जे घडले त्याबद्दल अनेकांचे अनेक प्रश्न आहेत. लोकांनी हिंदू म्हणूनच हे सरकार निवडून दिले आहे ना ? मग देशातला हिंदू हा केवळ हिंदू आहे म्हणून मारला जातोय याची जबाबदारी कोण घेणार ? सुरक्षा यंत्रणांकडून खूप गंभीर चूक झाली आहे असं का बरं वाटत नाही आपल्याला ? जेव्हा हे घडल तेव्हा सुरक्षा यंत्रणा कुठे होत्या ? सर्जिकल स्ट्राईक मोदींनी केल्याचे सर्वांना सांगितले. मग हा हल्ला कुणाच्या चुकीमुळे झाला ? याचे उत्तर कोण देणार ? सरकार व सत्ताधारी पक्ष धर्मद्वेश पसरवून आपली जबाबदारी झटकू शकत नाही, लोकांच्या प्रश्नांची उत्तरे सरकारला कधीतरी द्यावीच लागतील, असेही राजू पाटील यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.