कल्याण ( ठाणे ) : डोंबिवली पूर्वेकडील औद्योगिक विभागातील निवासी भागात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दोन प्रशस्त इमारती होत्या. 2020 नंतर या इमारती धोकादायक झाल्याने पोलिसांच्या कुटुंबियांनी येथील घर रिकामे करून दुसऱ्या ठिकाणी राहण्यास गेले.
गेल्या चार पाच वर्ष बंद पोलीस वसाहतीमध्ये रिकाम्या इमारतीचा दारुड्यांनी अड्डा बनवला आहे. सुनसान अशा परिसरात रात्री अपरात्री कोणतीही अनुचित घटना घडू शकते याची भीती व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मानपाडा पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे.
भग्नाअवस्थेतील इमारतीत रिकाम्या दारूच्या बाटल्या, सर्वत्र कचरा दिसतो. रात्रीच्या वेळी या रिकाम्या धोकादायक इमारतीत दारू पिण्यासाठी दारुडे येत असावेत असे मनसे विभागअध्यक्ष संजय चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यामुळे येथे कोणतेही गैव्यवहारी प्रकरण घडू नये याकरिता पोलिस प्रशासनाने दक्षता घ्यावी असे मनसे विभाग अध्यक्ष संजय चव्हाण यांनी मानपाडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या लक्षात आणून दिली आहे.पूर्वी असाच प्रकार पश्चिमेकडील बावन्नचाळ परिसरात होत होता. तेथील बंगले भग्नावस्थेत होते. त्यांचा कब्जा गर्दूल्ले, भिकारी, दारुडे आणि गैरकृत्य करणाऱ्या समाजकंटकांनी घेतला होता. परिणामी तेथे अनेक घटनांनी पोलिसांची झोप उडवली होती. त्यामुळे अशी परिस्थिती निवासी भागातील या पोलिस वसाहती परिसरात होवू नये. यासाठी मनसेचे विभागप्रमुख संजय चव्हाण व श्याम पिसके, शरद कोंढारकर, अजय घोरपडे आदी सहकाऱ्यांनी ही बाब उजेडात आणली आहे.
या पोलिस वसाहती परिसरात असणाऱ्या इमारतीत पूर्वी पोलिस अधिकारी व पोलीस कर्मचारी कुटुंबे वास्तव्य करीत होते. पोलिस वसाहत म्हणून एक वेगळी ओळख होती. निवासी विभागात पत्ता सांगण्यासाठी पोलिस वसाहतीचा लोकं आवर्जून उल्लेख करीत होते. पण आज हीच तो ओळखीची वास्तू भग्नावस्थेत असून समाजकंटक त्याचा दुरुपयोग करीत आहेत.
याविषयी संजय चव्हाण सांगतात की, एमआयडीसी विभागात १९९० च्या दशकात पोलीस वसाहत तयार करण्यात आली. पोलीस वसाहतीत मोठे मोठे पोलीस अधिकारी तसेच त्यांचे कुटुंबीय राहत होते. त्याच्या मुलांसोबत तसेच पोलीस यांच्या सोबत मैत्रीपुर्ण संबध होते. पोलीस नावात धाक होता. पण कौटुंबिक संबंध जिव्हाळयाचे होते. पण करोनानंतर एक एक करता सर्व पोलीस कुटुंबीय निघुन गेले. आता पुर्ण पोलीस वसाहत भग्नावस्थेत शेवटचे क्षण मोजत आहे. पोलीस वसाहत निर्मनुष्य असल्याने कोणताही अनुचित प्रकार होऊन पोलीस खात्याला कोणतेही गालबोट लागू नये. या परिसरात जाळी अथवा पत्रे लावून प्रवेश बंद करावा अशी मागणी केली आहे.