डोंबिवली : रूग्णसेवा 24 तास अखंड चालू ठेवावी लागते. कोणत्या क्षणी औषध लागेल, याचा नेम नसतो. रूग्णाला औषध उपलब्ध करून देण्यासाठी रात्री अपरात्री देखिल दुकानदाराला त्याचे दुकान उघडे ठेवावे लागते. त्यामुळे दुकानदारांवर कारवाई करण्याचा पोलिसांचा संबंध काय ? औषधे विकणारे नशेखोर आहेत का ? आज मेडिकल बंद करण्याचा प्रयत्न केला, उद्या दवाखाने व रूग्णालये बंद करतील, अशा प्रश्नांची सरबत्ती करत केमिस्ट असोसिएशने डोंबिवली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.
माजी आमदार तथा ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट एसोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मेडिकल केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी रामनगर पोलिस ठाण्यात जाऊन सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हमाडे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जावदवाड यांची भेट घेऊन निवेदन वजा तक्रारपत्र दिले. यावेळी डोंबिवली केमिस्ट असोसिएशनचे चेअरमन निलेश वाणी, अध्यक्ष दिलीप देशमुख, विलास शिरूडे, राजेश कोरपे, संजू भोळे, राहुल पाखले, लीना विचारे यांच्यासह मेडिकल दुकानांचे मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शुक्रवारी (दि.27) रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास केमिस्ट संघटनेचे सभासद राहूल चौधरी यांच्या राहूल मेडिकल अँड जनरल स्टोअर्स दुकानात दोन पोलिसांनी घुसून कोणतेही ठोस कारण नसताना खेचून बाहेर काढले आणि पोलिस ठाण्यात नेले. या दुकानात रूग्ण औषध घेत असताना त्यांच्याच समोर जबरदस्तीने दुकान बंद करण्यास भाग पाडले. राहूल चौधरी हे गेल्या अनेक वर्षांपासून रात्री 11.30 ते 12 वाजेपर्यंत रूग्णसेवा करत असतात. त्यांना पोलिसांनी दुकान बंद करण्यास सांगितले. कर्मचाऱ्यांनी दुकान बंद करण्यास घेतले असताना देखील दुकान मालकास खेचून बाहेर काढले आणि सर्वांसमोर अपमानास्पद अशी वागणूक दिली. या सर्व प्रकाराचे व्हिडिओ फुटेज पोलिसांनी तपासावेत. शिवाय कोणतेही ठोस कारण नसतानाही दुकान मालक राहूल चौधरी यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
यातून औषध विक्रेत्यांना लक्ष करून त्यांच्यावर जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे लक्षात येते. या घटनेबाबत केमिस्ट संघटना तीव्र निषेध नोंदवत आहे. आमच्या सभासदांना योग्य न्याय न मिळाल्यास नाईलाजास्त्वव आम्हाला एकदिवसीय बंद करून आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा सदर निवेदनातून देण्यात आला आहे. या संदर्भात संघटनेने घडलेल्या घटनेची विस्तृत चौकशी करण्यात येऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. औषध विक्रेत्यांवर कुठल्याही ठोस कारणाशिवाय दुकान बंद करण्याची सक्ती करण्यात येऊ नये. राहूल मेडिकलला देण्यात आलेले समजपत्र मागे घेण्यात यावे, याकडेही असोसिएशनने लक्ष वेधले आहे. संघटनेच्या मागण्यांचा पोलिसांनी गांभीर्यपूर्वक विचार करावा. अन्यथा रात्री 10 वाजल्यानंतर सर्व औषध दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेला घ्यावा लागेल. मात्र त्यानंतर उद्भवणाऱ्या संकटांना पोलिस प्रशासन जबाबदार राहील, असाही इशारा असोसिएशनने दिला आहे.