पाणी पुरवठा बंद  Pudhari Photo
ठाणे

ठाणे : पाणी बील थकवणाऱ्यांचा पाणी पुरवठा होणार खंडित; पुढील वर्षी अभय योजना बंद

वर्षभरात 12790 पाणी जोडण्या खंडित; 136 कोटी रुपयांच्या बिलांची वसुली

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे पाणी बील न भरणाऱ्या ग्राहकांचा पाणी पुरवठा खंडित करण्यात येत आहे. बुधवारी (दि.26) रोजी दिवसभरात १२९ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. वर्षभरात पाणी पुरवठा विभागाने एकून १२ हजार ७९० जोडण्या खंडित केल्या आहेत. दिवसभरात दोन कोटी रुपयांहून अधिक बिलांची वसुली करण्यात आली.

पाणी पुरवठा विभागातर्फे थकबाकी आणि चालू बिल वसुलीची मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी जास्तीत जास्त बिल वसुली करण्यात येणार आहे. मोठे गृहसंकुल, टाॅवर, व्यावसायिक ग्राहक यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. वर्षभरात आतापर्यंत, १३ हजार ४०२ जणांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. २ हजार ३६१ मोटर पंप जप्त करण्यात आले असून ६७६ पंप रुम सील करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.

नुकत्याच झालेल्या विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी विविध विभागांच्या महसुलाच्या वसुलीचा आढावा घेतला होता. तसेच, मार्चअखेरपर्यंतचा काही दिवसांचा उपलब्ध कालावधी उपयोगात आणून सर्व विभागांनी त्यांच्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश दिले होते. पाणी पुरवठा विभागाने या आर्थिक वर्षात आतापर्यंत थकबाकी आणि चालू बिलांच्या २२५ कोटी रुपयांपैकी १३६ कोटी रुपयांची वसुली केली आहे. ही वसुली गेल्यावर्षीच्या याच काळातील वसुलीपेक्षा १३ कोटी रुपयांनी अधिक आहे.

मार्च अखेरपर्यंत थकबाकीसह पाणी बिलाची रक्कम भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा पाणी पुरवठा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बंद करण्यात येणार आहे. तसेच, थकबाकीवरील प्रशासकीय आकार, दंड/व्याज यांच्यावर लागू असलेली १०० टक्के माफीची अभय योजना पुढील वर्षी लागू होणार नाही. या अभय योजनेची मुदत ३१ मार्चपर्यंतच राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT