ठाणे : दिलीप शिंदे
राज्यात उकाड्याने जनता हैराण झाली असून अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईना तोंड द्यावे लागत आहे. मुंबई, ठाणे, कोल्हापूर, पुणे, नागपूर नाशिक अशा अनेक शहरी भागांना पाणीपुरवठा करणार्या राज्यातील 2 हजार 997 धरणांमध्ये 47. 47 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.
गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा 29 मार्चरोजी सव्वा सात टक्क्यांनी अधिक असल्याने पाणी कपातीला सामोरे जावे लागणार नाही, अशी परिस्थिती असल्याचे दिसून येते. त्यामुळे मुंबई, ठाणेकरांना मुबलक पाणी पुरवठा होत राहणार असल्याचे सकारात्मक चित्र आहे.
कोकण, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, पुणे, नाशिक या विभागात पाणी साठा समाधानकारक असले तरी मार्च महिन्यापासूनच या विभागातील ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा जनतेला सोसावे लागत आहे. राज्यातील 138 मोठ्या प्रकल्पांमध्ये 47. 99 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून 260 मध्यम प्रकल्पांमध्ये 52. 49 टक्के पाणी साठा आहे. राज्यातील 2 हजार 599 लघु प्रकल्पांमध्ये 40. 24 टक्के पाणी उपलब्ध आहे. राज्यातील सर्व धरणांमध्ये 19 हजार 224. 75 दशलक्ष घनमीटर पाणी साठा उपलब्ध आहे.
मुंबई, ठाणे, रायगडसह कोकणाला पाणीपुरवठा करणार्या 173 धरणांमध्ये 29 मार्च पर्यंत 2 हजार 2. 3 द. ल. घ. मीटर उपयुक्त पाणी साठा उपलब्ध आहे. गतवर्षीच्या पाणी साठ्याच्या तुलनेत धरणांमध्ये एक टक्का पाणीसाठा अधिक असल्याने मुंबई, ठाणे जिल्ह्यातील जनतेला पाणी कपातीला सामोरे जावे लागणार नाही. बारवी, भातसा, निम्न चोंडे, मोडकसागर, तानसा, ऊर्ध्व घाटघर, मध्य वैतरणा, तिल्लारी, डोलवाहल, धामणी, कवडसा, आदी धरणांमध्ये सरासरी 40 ते 49 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबई, ठाणेकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार नाही,या असे सकारात्मक चित्र आहे. दुसरीकडे शहरी भागातील मुंबई, ठाणेकरांची तहान भागविणार्या शहापूर तालुक्यातील ग्रामीण जनतेला मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे परस्पर विरोधी चित्र आहे.