मुंब्रा : ठाणे महापालिकेने देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी मुंब्रा, दिवा आणि कळवा परिसरातील पाणीपुरवठा बुधवार, २८ ऑक्टोबरपासून सलग २४ तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवार, २९ ऑक्टोबरपर्यंत हा शटडाऊन लागू राहणार असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीपुरवठा बंद होण्यापूर्वीच पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुंब्रा-दिवा प्रभाग समितीच्या हद्दीतील बहुतांश भागांचा पाणीपुरवठा या काळात पूर्णपणे बंद राहणार आहे. मात्र, प्रभाग क्रमांक २६ आणि ३१ मधील काही निवडक भागांना या शटडाऊनमधून वगळण्यात आले आहे. या निर्णयाचा फटका मुंब्रा आणि दिव्यासह कळवा परिसरातील नागरिकांनाही बसणार आहे.
दरम्यान, परतीच्या पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिल्याने आणि मान्सूनने लवकर माघार घेतल्याने राज्यातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने १० टक्के पाणीकपात लागू केली असून, ही कपात ऑगस्ट २०२७ पर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आधीच पाणीकपातीचे संकट असताना २४ तासांचा शटडाऊन लागू होणार असल्याने नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पिण्याचे पाणी, स्वयंपाक आणि दैनंदिन गरजांसाठी आवश्यक तेवढा साठा करून ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.