ठाणे : ठाणे जिल्ह्यातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठीत बोलण्यास मनाई केल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता, यावर मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांच्या वतीने शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर शिक्षण विभागाने तत्काळ दखल घेत, सर्व शाळांना सक्त आदेश काढले असून, विद्यार्थ्यांना इंग्रजीत बोलण्यास सक्ती केल्यास संबंधित शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांवर मराठी भाषेचा वापर न करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याबाबत मनविसेचे राज्य सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी मनविसे शिष्टमंडळासह 2 एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार सादर केली होती. काही सीबीएसई व आयसीएसई माध्यमाच्या शाळांमध्ये वर्गात, आवारात आणि उपक्रमांमध्ये मराठीत बोलल्यास विद्यार्थ्यांना अपमानित केल्याचेही सांगण्यात आले होते. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी अधिकृत आदेश काढला. या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक, माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी मराठीतून संवाद साधावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. फक्त मराठी विषयापुरते भाषेचे शिक्षण न देता, इतर सर्व उपक्रमांमध्येही विद्यार्थ्यांनी मराठीचा वापर करावा, असे आदेशात नमूद आहे.
शासन निर्णय 13 डिसेंबर 2023 अन्वये, शाळांमध्ये मराठी ही अध्यापनाची अनिवार्य भाषा असून, तिचा वापर रोजच्या संवादात, चर्चासत्रात, नाट्य व भाषण स्पर्धांमध्ये तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये होणे आवश्यक आहे. परंतु काही शाळा या निर्णयाला डावलून विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलण्यास प्रवृत्त करत आहेत. याचा थेट परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांना मातृभाषेचा आत्मविश्वास गमवावा लागत आहे.
विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान, इतिहास यांसारखे विषय इंग्रजीतून शिकले तरी संवादासाठी मराठी भाषा आवश्यक आहे, असे मनविसेच्या निवेदनात म्हटले होते. शिक्षण विभागाच्या परिपत्रकानंतर आता इंग्रजी माध्यमाच्या शाळांनाही मराठी भाषेचा आदर ठेवत शाळेतील संवादात तिचा समावेश करणे बंधनकारक असेल. हा निर्णय केवळ तक्रारीपुरता मर्यादित न राहता, राज्यभरात मातृभाषेला स्थान देण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल ठरत असून, शिक्षण क्षेत्रातील भाषिक असंतुलन रोखण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास पाचंगे यांनी व्यक्त केला.अ