भाईंदर : राजू काळे
मिरा-भाईंदर महापालिकेच्या चेने येथील एका मराठी शाळेमधील इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शिक्षकच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असले तरी या विद्यार्थ्यांना एका कंत्राटी शिक्षकाकडून केवळ इंग्रजी विषयच शिकविला जात असल्याचे समोर आले आहे. मात्र इतर विषय शिकविण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या इयत्ता 10 वीतील प्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल आहे.
पालिकेने आपल्या अखत्यारीतील शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यांना किमान इयत्ता 10 वी पर्यंत शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी प्रशासनाने 2022 मध्ये इयत्ता 9 वी चे वर्ग सुरू केले. हे वर्ग सुरुवातीला 5 मराठी व उर्दू शाळांमध्ये सुरू करण्यात आले. त्यात काशी मराठी शाळा क्रमांक 4, घोडबंदर मराठी शाळा क्रमांक 9, पेणकर पाडा शाळा क्रमांक 14, माशाचा पाडा मराठी शाळा क्रमांक 19 व मीरारोड येथील उर्दू शाळा क्रमांक 34 चा समावेश आहे. सुरुवातीला या शाळांमध्ये इयत्ता 9 वी साठी 319 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. यापूर्वी पालिकेच्या 35 शाळांमध्ये केवळ इयत्ता 1 ते 8 वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षणच दिले जात होते. या शाळांमधून इयत्ता 8 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढे खासगी शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागत होता.
पालिका शाळांमध्ये शिक्षण घेणारे बहुतांशी विद्यार्थी गरीब कुटुंबातील असल्याने खासगी शाळांमध्ये प्रवेश घेणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे ठरत असल्याने त्यांना अर्धवटच शिक्षण सोडावे लागत होते. अशा विद्यार्थ्यांची शैक्षणिक ससेहोलपट थांबविण्याच्या उद्देशाने प्रशासनाने 2022 पासून सुरुवातीला 5 शाळांमध्ये इयत्ता 9 वीचे वर्ग सुरू केले. हे विद्यार्थी गतवर्षी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांचे इयत्ता 10 वीचे शिक्षण सुरू असले तरी या माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पालिकेतील शिक्षकांची शिकवणी तोकडी पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने प्रशासनाने सुमारे 25 शिक्षकांची ठोक मानधनावर नियुक्ती केली. यातील काही शिक्षक वेळेवर वेतन मिळत नसल्याच्या कारणास्तव नोकरी सोडून गेले. तर काही कंत्राटी शिक्षक केवळ गणित, विज्ञान, इंग्रजी विषयच शिकवीत असल्याचे समोर आले आहे. यामुळे त्यांच्या इतर विषयांच्या शिक्षणाची पंचाईत झाली. यावर उपाय म्हणून पालिका शाळांमध्ये स्थायी स्वरूपात असलेले पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेल्या शिक्षकांना इयत्ता 9 वी व 10 वीतील विद्यार्थ्यांना शिकविण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले. मात्र त्याचा श्री गणेशा अद्याप झाला नसल्याचे सुत्राकडून सांगण्यात आले. अशातच प्रशासनाने चेने येथील मराठी शाळा क्रमांक 10 मध्ये यावर्षी इयत्ता 9 वीचा वर्ग सुरू केला आहे. या वर्गात सध्या सुमारे 25 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना शिकविण्यासाठी प्रशासनाने 2 कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती केली होती. यातील एक शिक्षक काही महिन्यांपूर्वी नोकरी सोडून गेल्याने एकाच कंत्राटी शिक्षकावर या शाळेतील इयत्ता 9 वीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अवलंबून आहे.
एका कंत्राटी शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना केवळ इंग्रजी विषयच शिकविला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून हे विद्यार्थी इंग्रजी विषयाखेरीज इतर विषयांच्या अभ्यासापासून वंचित राहिले आहेत किंवा त्यांना स्व-अध्ययन करावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे त्या विद्यार्थ्यांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले असून त्यांच्या पुढील वर्षीच्या इयत्ता 10 वीतील प्रवेशावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
चेने मराठी शाळेतील इयत्ता 9 वीतील विद्यार्थ्यांना इंग्रजीखेरीज इतर विषय शिकविण्यासाठी तसेच त्यांच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये, यासाठी तात्काळ पुरेशा व सक्षम शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागांच्या अधिकार्यांची भेट घेतली असता त्यांना तूर्तास आश्वासन देण्यात आल्याचे पालकांकडून सांगण्यात आले.