देशाला स्वातंत्र मिळवून आज 76 वर्ष उलटूनही शहापूर विधानसभेची निवडणूक रस्ते, पाणी यासारख्या प्रश्नांभोवती फिरत आहेत. मात्र त्यापलीकडे देखील बहूसंख्य मतदारांच्या जीवनाशी निगडित अनेक संविधानिक, सामाजिक, शैक्षणिक व स्थानिक मुद्दे असून ते सातत्याने दुर्लक्षित राहत असल्याची खंत मुंबई कुणबी समाजोन्नती संघाच्या शहापूर शाखेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शाखेकडून हाताळले जाणारे विषय सामाजिक व राजकीय पटलावर चर्चेले जावेत व विधानसभेचे उमेदवार व मतदार याच्यापर्यंत हे विषय पोहचवले जावेत या उद्देशाने सदर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. शाखेचे उपाध्यक्ष अनिल भोईर यांनी शाखेबाबत थोडक्यात माहिती दिली. शाखेचे खजिनदार नामदेव तिवरे व उपाध्यक्ष भगवान कुडव यांनी शाखेच्या वतीने संविधानिक, शैक्षणिक, कृषी विषयक व स्थानिक मुद्द्यांबाबत काही मागण्या उपस्थित करुन त्यांच्या आवश्यकतेबाबत विश्लेषण केले.यामध्ये ओबीसीसह सर्वांची जातनिहाय जनगणना व्हावी, नोकर्यांचा अनुशेष भरणे, ठाणे जिल्हयात महाज्योती संस्थेचे विभागीय कार्यालय सुरू करणे, ठाणे जिल्ह्यात नवोदय विद्यालय सुरू करणे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करणे,राज्यात स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, केजी ते पिजी शिक्षण मोफत करण्यासाठी विधानसभेत पाठपुरावा करणे, अल्पभूधारक शेतकर्यांसाठी संपुर्ण शासकिय अनुदानित योजना लागू करणे या प्रमुख मागण्यांचा समावेश होता. तसेच शहापूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टर,अन्य कर्मचारी व यंत्रसामुग्री यांची उपलब्धता, भूमिपुत्रांना औद्योगिक क्षेत्रात 80 टक्के नोकर्या राखीव ठेवणे आणि प्रत्येक विभागात संत तुकाराम अभ्यासिका व ग्रंथालय उभारावेत अशा मागण्या मांडण्यात आल्या.शाखेच्या वतीने मांडण्यात आलेल्या विषयांबाबत जो उमेदवार व त्यांचे पक्ष प्रतिसाद देतील त्या उमेदवाराला निवडणुकीत पाठिंबा देण्याबाबत शाखेकडून एकमताने निर्णय घेण्यात येईल असे जाहीर करण्यात आले.
सदर पत्रकार परिषदेसाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका शहापूरच्या वतीने उपाध्यक्ष भगवान कुडव,अनिल भोईर,सचिव उमेश पाटील, खजिनदार नामदेव तिवरे सहसचिव काळुराम ठाकरे, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर चंदे,तालुका कार्यकारिणी सदस्या सुनीता दिनकर व ज्येष्ठ सदस्या सुरेखा सोनारे उपस्थित होते. तसेच महिला कमिटी अध्यक्षा करुणा पाटील,सचिव कांचन विशे यांसह शाखेच्या विभागीय समित्यांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.