ठाणे : राज्यात भाषिक मुद्द्यावरून मराठी आणि परप्रांतीय असा वाद रंगला असताना ठाण्यात एका मद्यपी परप्रांतीयाने चक्क मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांचे नाव घेऊन त्यांना शिवीगाळ आणि त्यांच्यावर वार करण्याची धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ‘ये गांधी नगर है, यहा पे भय्या लोगो की ही चलेगी’ अशी धमकीच या मद्यपीने दिली आहे. धमकी देणाऱ्या मद्यपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकारानंतर मनसैनिक देखील आक्रमक झाले आहेत.
राज्यात सर्वच ठिकाणी मराठी आणि हिंदी असा भाषिक वाद पेटला असून काही दिवसांपूर्वीच लोकल ट्रेनमध्ये मराठी बोलण्यावरून अर्णव खैरे या तरुणही आपला जीव गमावला. मात्र हा वाद संपण्याची चिन्हे दिसत नसून ठाण्यात पुन्हा एकदा परप्रांतीय आणि मराठी असा वाद उफाळून आला आहे. ठाण्यातील गांधीनगर परिसरात असलेल्या अनिल वाईन शॉपच्या बाहेर शैलेश यादव या मद्यपीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांचे नाव घेऊन त्यांना चक्क शिवीगाळ करत त्यांच्यावर वार करण्याची धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.
त्यानंतर मनसेचे उप विभाग अध्यक्ष रविंद्र महाले यांनी चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात शैलेश यादव यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तर यादव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र या प्रकारानंतर आता ठाण्यातील वातावरण देखील चांगलेच तापले असून यामुळे पोलिसांची डोकेदुखी मात्र चांगलीच वाढली आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी विरोधात परप्रांतीय हा वाद कमी होण्याच्या ऐवजी वाढतच असून यामुळे राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे.
आमच्या नादाला लागाल तर कार्यक्रम फिक्स, मनसेचा इशारा...
या सर्व प्रकारानंतर मनसे आक्रमक झाली आमच्या नादाला लागाल तर कार्यक्रम फिक्स असा इशाराच मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.जो कोणी राज ठाकरे यांच्या बाबतीत बोलायची हिंमत करेल, तो कुठे आहे याचा आम्ही कधीही विचार करणार नाही. जगातील कोणत्याही कोपऱ्यात असेल त्याला महाराष्ट्र सैनिक चोप दिल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
हे कारस्थान भाजपचेच...
हे सर्व भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे, भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत ते अशा प्रकारची वक्तव्य करतात आणि त्यामुळे यांची हिंमत वाढते,असा आरोप जाधव यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाला तेच हवं आहे. या महाराष्ट्रात, मुंबई परिसरात उत्तर भारतीय आणि मराठी असा वाद निर्माण व्हावा आणि त्यातून उत्तर भारतीय लोकांकरिता सहानुभूती मिळावी आणि मत मिळावी, त्यामुळे ही लोक अशा प्रकारची वक्तव्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
वाईनशॉपच्या बाहेर रस्त्यावर खुलेआम केले जाते मद्यप्राशन
ज्या गांधीनगर परिसरात हा सर्व प्रकार घडला त्या ठिकाणी असलेल्या वाईनशॉपच्या बाहेर राजरोसपणे रस्त्यावरच खुलेआम मद्यपी मद्यप्राशन करत असतात. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पोलिसांच्या डोळयांदेखत हा सर्व प्रकार सुरु असतो. गांधीनगर हा परप्रांतीयांचा देखील गड मानला जातो.