खानिवडे (जि. पालघर) : पुढारी ऑनलाइन डेस्क । वसई तालुका विरार पूर्व येथील खानिवडे मध्ये होळी सणाचा उत्साह शिगेला पोहचला असताना विरार पूर्वेतील कणेर टोकरे पाडा परिसरात एका महिलेचे धडाशिवाय शीर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
येथील नागरिक होळीची लाकडे आणावयास गेले असताना त्यांना एका महिलेचे फक्त मुंडके दिसून आल्याने त्यांना चांगलाच घाम फुटला. त्यांनी तात्काळ मांडवी पोलिसांशी संपर्क साधून ही खबर दिली. हे शीर मांडवी पोलीस स्टेशन अंतर्गत कणेर पोलीस चौकी यांच्या हद्दीतील पिरकुंडा येथील रोडवर रस्त्यापासून तीस फुटाच्या अंतरावर दिसून आले. होलिका दहनासाठी संध्याकाळच्या सुमारास होळीनिमित्त सुकी लाकडे आणण्यासाठी कणेर ग्रामपंचायत टोकरे पाडा येथील ग्रामस्थ गेले होते. त्यावेळी त्यांना एका अज्ञात महिलेचे मुंडके आढळून आले. पोलिसांनी हे शीर ताब्यात घेऊन पोलीस पंचनामा करून तपास सुरू केला आहे. सदर महिला ही 30 ते 35 वयोगट दरम्यानची असल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. तर या महिलेची हत्या करून हत्या करणाऱ्याने पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने शीर व धड वेगळ्या ठिकाणी फेकले असावे असा प्राथमिक अंदाज यावेळी व्यक्त करण्यात येत होता. हे शीर कोणाचे असावे, धड कुठे असेल तर या महिलेचा मारेकरी कोण असेल याची उकल करण्यासाठी मांडवी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.