डोंबिवली : उन्हाच्या काहिलीने दीड महिन्यांपासून वातावरण पार करपून गेले आहे. रस्त्यावर फिरताना वा घरात थांबूनही पराकोटीला गेलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे सारेच हैराण झाले आहेत. अशा अस्वस्थ परिस्थितीत शनिवारी (दि.26) रोजी मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास अचानक अवेळी पावसाने हजेरी लावली. डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यामध्ये वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाल्याने रहिवासी सुखावले होते.
शुक्रवारी (दि.25) रोजी दिवसभर कडाक्याच्या उन्हामुळे सारेच हैराण झाले होते. वाऱ्याची साधी झुळुकही जाणवत नव्हती. शनिवारी मध्यरात्री सर्वजण गाढ झोपेत असताना डोंबिवलीच्या काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. घरातील पंखे आणि वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने खंडीत झालेला वीज पुरवठा पूर्ववत कधी होईल याची वाट पाहत मध्यरात्रीच्या सुमारास अनेक रहिवासी घराबाहेर, गच्चीवर, तर तर काही जण रस्त्यावर उभे होते. इतक्यात अचानक मध्यरात्री एक-दीड वाजण्याच्या सुमारास पाऊस पडू लागल्याने मातीचा सुगंधी दरवळ सर्वत्र पसरू लागला. अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला. आकाश पावसाच्या ढगांनी काळेभोर झालेले दिसून आले. आता पाऊस मोठ्या प्रमाणावर कोसळणार असा अंदाज नागरिक वर्तवत होते.
अचानक पावसाच्या हजेरीने रहिवासी सुखावले होते. अनेकांनी घराबाहेर पडून पावसात भिजण्याचा आनंद लुटला. मुसळधार पावसाची अपेक्षा करणाऱ्या रहिवाशांना थोड्या वेळाने हिरमोड झाला. सुरूवातीला जोर असलेला पाऊस नंतर रिमझिम ठिबकत राहिला. अर्ध्या तासापुरती जरी पावसाने हजेरी लावली होती तरी त्यानंतर मात्र वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला आला. खंडीत विद्युत पुरवठा पूर्ववत झाला. पाऊस आणि वीज आल्याने रहिवाशांनी समाधानी व्यक्त केले.
मराठवाड्याच्या उत्तर भागापासून ते मन्नारच्या आखातापर्यंत वाऱ्याची द्रोणिका रेषा तयार झाली आहे. त्यामुळे हवामान विभागाने राज्याच्या विविध भागांत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अशातच शुक्रवारी रात्री आठ वाजल्यानंतर आकाशात बाष्पयुक्त ढगांचे पुंजके येताना आढळून आले. परिणामी अवकाळी पाऊस अधून-मधून पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.