स्थानकाची तपासणी करताना रेल्वे पोलिस. pudhari photo
ठाणे

ठाणे: कल्याण रेल्वे स्थानकाला बॉम्बने उडवून देऊ, अज्ञाताने दिली धमकी

स्थानकावरील सर्व प्रवाशांना सतर्क राहण्याचे रेल्वे पोलिसांकडून आवाहन

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण रेल्वे स्थानकाला बॉम्बने उडवून देऊ, अशा आशयाची धमकी मंगळवारी रात्री अज्ञाताने फोनद्वारे पोलिसांनी दिली होती. या धमकीमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजली होती. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पोलिस आणि रेल्वे प्रशासनाने तात्काळ रेल्वे स्थानकावर धाव घेत बॉम्बचा शोध घेतला. मात्र बॉम्ब वा बॉम्बसदृश्य अशी कोणतीही वस्तू कुठेही आढळून आली नाही. त्यामुळे कल्याण स्थानकात बॉम्ब ठेवल्याची अखेर अफवा ठरली आहे. मात्र तरीही स्थानक आणि परिसरात तणावाचे वातावरण पसरू नये, यासाठी पोलिस आणि रेल्वे प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे.

मुंबईची लाईफलाईन असलेल्या उपनगरीय रेल्वेवरील कल्याण स्थानक हे मध्य रेल्वेच्या सर्वात व्यस्त जंक्शनांपैकी एक असून उपनगरीय अर्थात लोकल आणि लांब पल्ल्याच्या मिळून 760 गाड्या दररोज कल्याण रेल्वे स्थानकात थांबतात. मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण जंक्शनवर उतरून देशभरातील प्रवासी इतरत्र निघून जातात. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण हे महत्वाचे जंक्शन मानले जाते. कल्याण स्थानकातून जवळपास 2 ते 2.50 लाख प्रवाश्यांची गाड्यांतून चढ-उतार होत आहे. त्यात बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्यानंतर स्थानकावरील सुरक्षा कडक करण्यात आली असून योग्य खबरदारी घेतली जात आहे. तसेच स्थानकावरील सर्व प्रवाशांनाही सतर्क राहण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

जिवंत डिटोनेटर्स ठेवून बदमाश पसार

याच स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर 21 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळच्या सुमारास दोन खोक्यांमध्ये भरलेली 54 डिटोनेटर्स अर्थात स्फोटके आढळून आली होती. रेल्वे स्थानकात स्फोटकांचा इतका मोठा साठा आढळून आल्याने एकच खळबळ माजली होती. हस्तगत केलेली ही स्फोटके दगड खाणी अर्थात खदानींमध्ये सुरूंग स्फोटासाठी, वा विहिरी खोदण्याकरिता वापरली जात असल्याच्या क्षमतेची होती, असा निष्कर्ष पोलिसांनी तपासा दरम्यान काढला होता. या घटनेला 10 महिने उलटून गेले आहेत.

33 वर्षांपूर्वीच्या आठवणी जागल्या

8 नोव्हेंबर 1991 रोजी याच कल्याण रेल्वे स्थानकावर शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला होता. मुंबईहून सुटलेली लोकल कल्याणमध्ये येताच त्या लोकलमध्ये बॉम्बस्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तीशाली होता की या स्फोटात लोकलचे 4 डब्बे क्षतिग्रस्त झाले. 65 जण जखमी, तर 12 जणांचा मृत्यू झाला. बब्बर खालसा या शिख दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या रविंदर सिंग उर्फ ​​बिट्टू याला कल्याण बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरवण्यात आले.

कोण होता हा बिट्टू ?

रविंदर सिंग उर्फ ​​बिट्टू या दहशतवाद्याने व्हिक्टोरिया टर्मिनस (आत्ताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) - कल्याण लोकलमध्ये शक्तिशाली बॉम्ब ठेवला होता. या बॉम्बचा कल्याण स्थानकात स्फोट होऊन लोकलसह जीवितहानी झाली होती. हा दहशतवादी 2007 मध्ये पॅरोलवर सुटला होता. पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यातील सैदपूर पट्टी गावात राहत होता. मात्र तो गुरदासपूर सिंग नावाचा छद्म नाव वापरत होता. पॅरोलची मुदत संपल्यानंतर तो तुरूंगात परतला नाही. तेव्हापासून हा दहशतवादी बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते. बिट्टूने अटक होण्यापूर्वी देविंदर पाल सिंग भुल्लर आणि निशान सिंग या खलिस्तानी दहशतवाद्यांसोबत काम केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT