डोंबिवली : डोंबिवलीकर प्रवाशांची झपाट्याने वाढत चाललेली संख्या पाहता 15 डब्यांच्या गाड्या आणि लेडीज स्पेशल लोकल सोडण्याची मागणी केली आहे. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली आहे. रामभाऊ म्हाळगी आणि रामभाऊ कापसेंच्या नंतर रेल्वे प्रवाशांशी असलेल्या नात्याची परंपरा जपण्याचा प्रयत्न करत असल्याचे डोंबिवलीचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. बुधवारी (दि.23) सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांशी संवाद साधताना मंत्री चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
शहराचे वाढते नागरिकरण लक्षात घेऊन आगामी काळात 15 डब्यांच्या लोकल डोंबिवलीसह कल्याणहून सोडण्यासाठी आपण स्वतः आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी यांना सगळी माहिती दिली आहे. लवकरच सकारात्मक बदल घडतील, अशी माहिती डोंबिवलीचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. रामभाऊ म्हाळगी आणि रामभाऊ कापसे यांचे रेल्वे प्रवाशांशी असलेले अतूट नाते सर्वश्रुत आहे, ते जपण्याचा प्रयत्न करत असून रेल्वे प्रवासात किती अडचणी निर्माण होतात याचीही जाणीव आपणास असल्याचे ते म्हणाले. डोंबिवलीच्या प्रवाशांशी नेहमीच रेल्वे प्रवासात चर्चा होत असते, बुधवारी स्वतः येऊन माझा जाहीरनामा प्रवाशांना दिला. प्रवाशांनी त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या. वरिष्ठ पातळीवर डोंबिवलीकर प्रवाशांच्या सर्व व्यथा मांडणार आहोत. लांबपल्याच्या गाड्या वेळेत येत नाहीत, त्यावर देखील आम्ही चर्चा केली आहे. समस्या जास्तीतजास्त लवकर कशा सुटतील याकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहे. महिला स्पेशल लोकल कल्याण आणि डोंबिवलीमधून सोडण्यासाठी विशेष लक्ष घातले असल्याचे मंत्री चव्हाण यांनी महिला प्रवाशांना आश्वस्थ केले.