ठाणे : उल्हासनगर महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत अतिधोकादायक झाली असून तातडीने मुख्यालय इतरत्र हलवून नवीन इमारतीच्या बांधकामास सुरुवात करण्याची सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्तांना दिल्या आहेत. त्यामुळे धोकादायक इमारतीमध्ये राहणार्या नागरिकांप्रमाणे पालिका अधिकारी आणि कर्मचारी देखील जीव मुठीत घेऊन नागरिकांची कामे करीत असल्याची गंभीर बाब आमदार कुमार आयलानी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उघडकीस आणली. या नवीन इमारतीसाठी 200 कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे.
ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजपचे आमदार कुमार आयलानी यांनी उल्हासनगरमधील धोकादायक इमारती आणि त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी महापालिका मुख्यालयच अतिधोकादायक असल्याचे स्पष्ट झाले. उल्हासनगरमधील धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली लागत नसल्याने हजारो कुटुंब जीव मुठीत घेऊन जगत आहेत. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगरवासीयांसाठी विशेष सवलत देऊन रेडीरेकनरच्या 10 टक्के रक्कम भरून परवानगी घेण्याची विशेष योजना राबविली. मात्र त्यासही प्रतिसाद मिळत नसल्याचे आमदार आयलानी यांनी स्पष्ट केले.
मुख्यालयाचा कारभार पर्यायी जागेत हलविण्याचे निर्देश क्लस्टरच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवावा, अशी सूचनाही त्यांनी केली आणि नवीन आयुक्त मनीषा ओव्हाळ ह्या देखील धोकादायक कार्यालयात काम करतात, त्यांनाही धोका असल्याची टिपणी आयलानी यांनी करून प्रशासनाचे वाभाडे काढले. त्यावेळी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी इमारत किती धोकादायक याची माहिती देऊन नवीन इमारतीची बांधणी आणि तातडीने मुख्यालय इतरत्र हलविण्याची सूचना केली. हे ऐकून संपूर्ण सभागृह अवाक् झाले आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने मुख्यालयाचा कारभार पर्यायी जागेत हलविण्याचे निर्देश दिले. तसेच नवीन इमारत उभारण्यास 200 कोटींचा प्राथमिक प्रस्ताव शासनास सादर झाला असेल तर मंजुरी दिली जाईल असे स्पष्ट केले.