Ulhasnagar Five Storey Building Collapse Pudhari
ठाणे

Ulhasnagar Building Collapse | उल्हासनगरमध्ये पाच मजली इमारतीचा मागील भाग कोसळला

बाजार बंद असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली, हायड्रो कटरच्या सहाय्याने इमारत पाडण्याचे काम सुरू

पुढारी वृत्तसेवा

Ulhasnagar Five Storey Building Collapse

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प 3 येथील छत्रपती शिवाजी चौक परिसरात सोमवारी साई सृष्टी या पाच मजली व्यवसायिक इमारतीचा मागील संपूर्ण भाग अचानक कोसळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. सुदैवाने सोमवारी बाजार बंद असल्याने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही.

घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागासह पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीच्या आसपासचा परिसर रिकामा करण्यात आला. तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्याच्या दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात आली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या. दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसर सुरक्षित करण्यात आला असून कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, इमारतीचा उर्वरित धोकादायक भाग निष्कासित करण्यासाठी सोमवारी सायंकाळी पाच वाजता ५० फूट उंच अजस्त्र हायड्रो कटरच्या सहाय्याने इमारत पाडण्याचे काम सुरू करण्यात आले. संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाकडून अत्यंत खबरदारी घेत हे काम करण्यात येत आहे.

या दुर्घटनेनंतर सकाळपासून परिसरातील वीजपुरवठाही बंद करण्यात आला होता. इमारत पाडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रात्री ९ वाजेपर्यंत परिसरातील वीजपुरवठा तातडीने सुरू करण्याचे आदेश महापौर अश्विनी निकम यांनी दिले आहेत. पुढील दोन दिवस रस्ता हा मलबा उचलण्यासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT