ठाणे : ठाण्यातील ऋतू एन्क्लेव्ह या सोसायटीच्या आवारातील वृक्ष छाटणी करताना 70 पक्षांचा बळी गेला आहे. तर 25 हुन अधिक पक्षी जखमी झाले आहेत. यासंदर्भात ठाणे महापालिकेकडे तक्रार दाखल झाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पहाणे केल्यानंतर संबंधित सोसायटीचे पदाधिकारी आणि वृक्ष छाटणी करणारे कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी कासारवडवली पोलीस स्टेशनला पत्र देण्यात आले आहे. तर संबंधित सोसायटीलाही नोटीस देण्यात आली असून यासंदर्भात खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
सोसायटीच्या आवारातील वृक्षांच्या वाढलेल्या फांद्या कापण्यासाठी ऋतू एन्क्लेव्ह सोसायटी यांच्या वतीने ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे रीतसर अर्ज करण्यात आला होता. त्यानंतर वृक्ष प्राधिकरण विभागाने संबंधित सोसायटीला वृक्ष छाटणीची परवानगी दिली होती. ही वृक्ष छाटणी करण्यासाठी संबंधित सोसायटीने कंत्राटदाराची नियुक्ती केली होती. मात्र प्रत्यक्षात वृक्ष छाटणी करताना एक गुलमोराचे झाड आणि दुसरे अन्य जातीच्या झाडांवर असलेली पक्षांची घरटी उध्वस्त करण्यात आल्या.
यात 70 पक्षांचा बळी गेला आहे. तर 25 हुन अधिक पक्षी जखमी झाले. हा सर्व प्रकार घडल्यानंतर या संदर्भात पक्षीप्रेमींकडून ठाणे महापालिकेकडे तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार दाखल झाल्यानंतर प्रत्यक्ष ठिकाणी महापालिकेकडून पाहणी करण्यात आली. यावेळी पक्षांचा मृत्यू झाला असल्याचे आणि पक्षांना इजा पोहचवले असे उघड झाले आहे.
या सर्व प्रकारानंतर ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून संबंध सोसायटीला नोटीस देण्यात आली आहे. या नोटीसमध्ये वृक्ष छाटणी करताना ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे आणि अटींप्रमाणे वृक्ष छाटणी झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
नियमाप्रमाणे वृक्ष छाटणी करताना त्या वृक्षावर पक्षांचे घरटी तसेच वृक्ष पर्णहीन होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र सोसायटीने नेमलेल्या कंत्राटदाराने यासंदर्भात कोणतेच काळजी न घेतल्याने हा सर्व प्रकार घडला आहे. येत्या तीन दिवसात संबंधित सोसायटीने या सर्व प्रकाराबद्दल योग्य तो खुलासा न केल्यास सोसायटीचे पदाधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई आहे.
खासगी ठेकेदाराने पालिकेच्या संगतमताने या झाडांची छाटणी केली आहे. खर तर पावसाळापुर्वी छाटनी अपेक्षित होती. परंतु ह्या झाडांची छाटणी जुलै महिन्यात करण्यात आली असुन या छाटणीमुळे पक्षांचा दुर्दैवी मुत्यु झाला आहे.रोहित मोहिते, पक्षीमित्र