transfer pudhari file photo
ठाणे

ठाणे : दंगल रोखणार्‍या पोलीस उपायुक्तांची बदली

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : भिवंडी येथे धार्मिक दंगल माजविण्याचा सत्ताधार्‍यांचा प्रयत्न होता. मात्र, हा प्रयत्न पोलीस उपायुक्तांनी हाणून पाडला. दंगलीचा कट कुठे रचला गेला हे सर्व भिवंडीवासीयांना माहीत असून केवळ एका नेत्यासाठी पोलीस उपायुक्तांची बदली करण्यात आली आहे, असा आरोप करीत पोलिसांचा सत्ताधार्‍यांकडून राजकीय हत्यार म्हणून वापर केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच गणपती उत्सवात दंगल कुणाकडून घडवली जाऊ शकते, याची आगाऊ माहिती पोलिसांना दिली होती, असे खासदार सुरेश म्हात्रे यांनी स्पष्ट करीत आव्हाड - म्हात्रे यांनी माजी मंत्री पाटील यांच्यावर निशाणा साधला.

भिवंडीतील घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी जात असताना धार्मिक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळेस पोलिसांनी हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला. या घटनेनंतर पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या संदर्भात डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आपणाला दोन्ही समाजातील सुजाण नागरिकांनी माहिती दिली की, जर या पोलीस उपायुक्तांनी मध्ये उडी घेतली नसती तर भिवंडीत दंगल झाली असती; दंगल रोखणार्‍या अधिकार्‍याला असे बक्षिस दिले जात असेल, तर संपूर्ण पोलीस दलाचे मनोबल खच्चीकरण होणार नाही तर काय होईल? आपणाला अंतर्गत माहिती अशी मिळत आहे की, या बदलीला पोलीस दलातील अनेक अधिकार्‍यांनी प्रचंड विरोध केला आहे. तेथील बीजेपीचा एक राजकीय नेता ही दंगल घडवू इच्छित होता.

दंगल झाली नाही आणि त्याचे परिणाम म्हणून पोलीस उपायुक्तांची बदली करण्यात आली. याचा अर्थ स्पष्ट आहे की, या सरकारला आगामी निवडणुकीत पराभव पत्करावा लागणार असल्याचे सर्वे आले आहेत. त्यामुळेच धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी काहीही करून सत्ताधारी वर्गाला दंगल भडकवायची आहे. पोलिसांना हत्यार म्हणून पुढे पाठवायचे आणि दंगल घडवायची, हे तत्व सरकारचे आहे. मी पोलिसांनाच विनंती करेन की, तुम्ही राजकीय हत्यार बनू नका. या सरकारला दंगल घडवूनच निवडणूक जिंकायची आहे. त्यांच्या हातचे बाहुले बनू नका. भाजपचे माजी मंत्री कपिल पाटील हे उपायुक्तांच्या बदलीमागे असल्याचे त्यांच्या वक्तव्यांवरून दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले.

दंगलीच्या कटाची पोलिसांना माहिती : खासदार सुरेश म्हात्रे

लोकसभा निवडणूक आणि भिवंडीत दंगलीचे कारस्थान उधळून लावणार्‍या अधिकार्‍याला बक्षीस देण्याऐवजी त्यांची तातडीने बदली करण्यात आल्याचा निषेध खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी व्यक्त करीत सूत्रधारांवर कारवाईची मागणी केली. भिवंडीत गणेशोत्सवात दंगल घडविली जाऊ शकते, या कटाची माहिती मी अगोदरच पोलिसांना दिली होती. त्यानुसार त्यांनी योग्य काळजी घेतली म्हणून पुढील अनर्थ टळला. लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री कपिल पाटील यांनी कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण केला होता. तेव्हा याच पोलीस उपायुक्तांनी योग्यरित्या परिस्थिती हाताळली होती. त्यांची कोणतीही चौकशी न करताच बदली करण्यात आली असून त्यामागे भाजपचा माजी मंत्री असल्याचा आरोपही म्हात्रे यांनी केला.

मी मुख्यमंत्र्यांचा चेहरा : डॉ. जितेंद्र आव्हाड

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्र्यांच्या चेहरा कोण? असे महायुतीच्या नेत्यांकडून विचारले जात असल्याचा प्रश्न विचारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, जाऊन सांगा, असे त्यांना उत्तर देत विरोधकांच्या मागणीतील हवा काढून टाकली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT