मिरा रोड : काशीमीरा परीसरातील डाचकूल पाडा येथे दोन गटात वाद झाला होता. यामध्ये कन्नोज रिक्षाचालकांच्या टोळीने तलवार व काठ्यासह हल्ला केला होता. या हल्लयाप्रकरणी ५५ ते ६० लोकांवर गुन्हा दाखल झाल्या नंतर वाहतूक पोलिस हे बेकायदा रिक्षा चालकांना संरक्षण देत असल्याचे आरोप झाले. या घटनेनंतर वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी तपासणी करून ६५९ रिक्षांवर कारवाई केली आहे.
काशीमीरा येथील डाचकूल पाडा येथे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असून या झोपड्यांमध्ये अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नागरिक राहत आहेत. या परीसरात सार्वजनिक रस्त्यांवर रस्ता अडवुन शेकडो रिक्षा उभ्या केल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. रस्त्यामध्ये रिक्षा उभ्या करु नका सांगितल्यास ते भांडण करतात. त्यावरून रहिवासी व रिक्षा चालक यांच्यात वाद सुरु होता. या वादातून रिक्षाचालकांच्या टोळीने चौघांवर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली होती.
त्यानंतर रिक्षांची तोडफोड करण्यात आली. ही घटना घडल्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी सकाळपासून वाहतूक पोलिसांनी काशिमीरा, मीरारोड व भाईंदर रेल्वे स्थानक सह शहरातील विविध प्रमुख रिक्षा व चालकांची तपासणी सुरु केली. मीरा भाईंदरमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्षा बोगस व नियमबाह्य चालत आहेत. असे निर्देशनास आले. रिक्षाची योग्य कागदपत्रे नसणे, फिटनेस प्रमाणपत्र नाही, परवाना, बेंच, लायसन नाही, गणवेश न घालणे व बॅच न लावणे, मोबाइलवर बोलणे, चार सीट नेणे, मीटर प्रमाणे भाडे नाकारणे, मनमानी शुल्क वसुली आदी सह अनेक गैरप्रकार चालत असल्याचे आढळून आले आहे. याबाबत देखील अनेक नागरीकांच्या तक्रारी समोर आल्या आहेत. शनिवार पर्यंत वाहतूक पोलिसांनी ६५९ रिक्षांवर कारवाई करत ५ लाख ८९ हजार ५८० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामध्ये पेड कारवाई २२५ रिक्षांवर तर अनपेड कारवाई ३६० रिक्षांवर केली आहे.
७३ रिक्षांवर कोर्ट केस केल्या आहेत. यामध्ये २३७ रिक्षा जप्त केल्या होत्या, त्यापैकी १७० रिक्षा चालक-मालक यांनी तडजोड फी भरल्याने त्या परत करण्यात आल्या आहेत. ६७ रिक्षा अजून जप्त केल्या आहेत. पुढील कारवाई सुरु असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सागर इंगोले यांनी दिली आहे.