ठाणे : दिलीप शिंदे
वाहतूक कोंडीमुळे ठाण्यासह जिल्ह्यातील नागरिक त्रस्त झाले असून त्याला प्रशासनाचा ढिसाळपणा कारणीभूत आहे. सकाळी आणि संध्याकाळी अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी काढले असतानाही त्या वेळांमध्ये आजही अवजड वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचे पडसाद 26 सप्टेंबररोजी होणार्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उमटून आमदारांकडून प्रशासनाची वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 26 सप्टेंबरला नियोजन भवनात होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची ही पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक असणार आहे. या बैठकीला वनमंत्री गणेश नाईक हे हजर राहणार की पाठ फिरविणार याकडेही सार्यांचे लक्ष लागले आहे.
जनता दरबारावरून नामदार शिंदे आणि नामदार नाईक यांच्यातील वाद आणि एकमेकांवरील कोट्या ह्या चर्चेचा विषय बनलेल्या आहेत. ठाणे मेट्रोच्या चाचणीच्या कार्यक्रमातही मंत्री गणेश नाईक नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकार्यांना आमंत्रण ही नव्हते. त्यात काही दिवसांमध्ये महापालिका आणि जिल्हा परिषेदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता असल्याने जिल्हा नियोजनाच्या या बैठकीकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
गेल्या आर्थिक वर्षातील निधी 100 टक्के खर्च झालेला आहे. 2025- 2026 या आर्थिक वर्षात ठाणे जिल्ह्यासाठी 1 हजार 50 कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली असून त्यापैकी 301 कोटी 50 लाखांचा निधी 31 ऑगस्टपर्यंत ठाणे जिल्ह्याला प्राप्त झालेला आहे. या प्राप्त निधींपैकी 30 कोटी 34 लाखांचा निधी अर्थात 10 टक्के निधी खर्च झालेला आहे. आर्थिक परिस्थिती पाहता ठाणे जिल्ह्याचा मंजूर निधी मिळावा अशी मागणी आमदारांची आहे.