ठाणे : शहरातील खड्ड्यांचे साम्राज्य आणि घोडबंदर रोडच्या दुर्दशेमुळे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी लक्षात घेता, गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात वाहतुकीचा बोजवारा उडू नये आणि मिरवणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी शहरातील प्रमुख मार्गांवरील जड आणि अवजड वाहनांना ठराविक दिवसांसाठी 'प्रवेशबंदी' जाहीर करण्यात आली आहे.
सध्या गणेशोत्सवाच्या आगमनामुळे बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी वाढली आहे, तर दुसरीकडे अनेक चाकरमानी कोकणात जाण्यासाठी बाहेर पडले आहेत. यामुळे ठाण्यातील रस्त्यांवर आधीच प्रचंड ताण आला असून, नागरिकांना तीन ते चार तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. या समस्येचा फटका अगदी मंत्र्यांनाही बसला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे गणेश विसर्जन आणि ईदच्या मिरवणुकांना गालबोट लागू नये, यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी हे निर्बंध लागू केले आहेत.
पोलिसांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, तीन राष्ट्रीय महामार्ग आणि एका राज्यमार्गावरून ठाणे शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना २८ , ३१ ऑगस्ट, २ ,६ सप्टेंबर, ८ सप्टेंबर ईद-ए-मिलाद दिवशी पूर्णपणे प्रवेशबंदी असेल. या व्यतिरिक्त इतर दिवशी जड वाहनांना रात्री १० ते सकाळी ६ या वेळेतच शहरात प्रवेश करण्याची परवानगी असेल.
ठाणे शहरातील रस्त्यांची, विशेषतः घोडबंदर रोडची झालेली चाळण वाहतूक कोंडीसाठी प्रमुख कारण ठरत आहे. त्यातच सणांच्या दिवसांत वाहनांची संख्या वाढल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. जड वाहनांमुळे वाहतुकीचा वेग मंदावतो आणि कोंडीत भर पडते. त्यामुळे विसर्जन मिरवणुका आणि ईदचे जुलूस कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावेत, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.
पोलिसांच्या या निर्णयामुळे विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांवरील ताण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. नागरिकांनी आणि वाहतूकदारांनी या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. या उपाययोजनेमुळे सणांचा आनंद नागरिकांना वाहतूक कोंडीच्या त्रासाशिवाय घेता येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.