Snake Rescuers Titwala Pudhari
ठाणे

Titwala Python Rescue | टिटवाळ्याजवळ आठ फुटी अजगराकडून तीन कोंबड्या फस्त; सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका

कल्याण वन विभागाच्या देखरेखीखाली या अजगराला पुन्हा निसर्गात मुक्त करण्यात आले

पुढारी वृत्तसेवा

Snake Rescuers Titwala

डोंबिवली : टिटवाळ्या जवळच्या उतणे गावातील एका खुराड्यात घुसून तीन कोंबड्या फस्त करणाऱ्या तब्बल आठ फूट लांबीच्या अजगराला सुरक्षितपणे पकडण्यात सर्पमित्रांना यश आले आहे. कल्याण वन विभागाच्या देखरेखीखाली या अजगराला पुन्हा निसर्गात मुक्त करण्यात आले असून सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, उतणे येथे राहणाऱ्या मेघा जाधव यांच्या मालकीच्या कोंबड्यांच्या खुराड्यात एका भल्यामोठ्या अजगराने शिरकाव केला होता. या अजगराने तब्बल तीन कोंबड्या फस्त केल्या. त्यानंतर तो त्याच खुराड्यात ठाण मांडून बसला होता. हे भीतीदायक दृश्य पाहताच जाधव कुटुंबीयांची घाबरगुंडी उडाली होती.

मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखून तत्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी कोणताही वेळ न दवडता लगेचच उतणे गाव गाठले. या बचाव कार्यात त्यांना रवी दांडगे यांचीही मोलाची साथ मिळाली. दोघांनी मिळून अत्यंत शिताफीने आणि कोणतीही इजा न पोहोचवता अजगराला सुरक्षितपणे जेरबंद केले.

अजगर पकडला गेल्याने परिसरातील ग्रामस्थांची भीती दूर झाली. त्यानंतर वन विभागाला या घटनेची रीतसर माहिती देण्यात आली. कल्याणचे वनपाल फुलचंद खटके यांच्या मार्गदर्शनाखाली या अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले असल्याचे सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी सांगितले.

वन्यजीवांना न मारता त्यांना वाचविण्यासाठी ग्रामस्थांनी दाखविलेली जागरूकता आणि सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे एका दुर्मिळ वन्यजीवाला जीवदान मिळाले असून परिसरात या बचाव कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT