टिटवाळ्याजवळच्या एका गावात नराधमाने 2 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला.  Pudhari News Network
ठाणे

'विकृती'चे सत्र सुरूच: टिटवाळ्यात संतापाची लाट; २ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : अंगणात खेळत असताना फरफटत निर्जनस्थळी नेऊन 35 वर्षीय नराधमाने 2 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील महागणपतीच्या टिटवाळ्याजवळच्या एका गावात घडली. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल होताच तालुका पोलिसांनी तपास चक्रांना वेग देत नराधमाला अवघ्या काही तासांतच गजाआड केले.

संपूर्ण राज्यात संतापाची लाट

महाराष्ट्रात अबला नारींसह अगदी उमलत्या कळ्यांना कुस्करून टाकण्याच्या घटना थांबण्याचे नावच घेत नाही. काही दिवसांपूर्वी बदलापुरातील दोघा चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. या घटनेच्या जखमा ताज्या असतानाच आता टिटवाळ्याजवळील एका गावात या घटनांची पुनरावृत्ती झाल्याचे तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतून उघडकीस आले आहे.

चिमुरडीला ओढत झाडाझुडपांत अत्याचार

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारच्या सुमारास अंगणात खेळत असताना दोन वर्षीय चिमुरडीवर त्याच भागात राहणाऱ्या नराधमाची नजर पडली. त्यांने चिमुरडीला ओढत निर्जनस्थळी झाडाझुडपांत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर चिमुरडीला तेथेच सोडून नराधमाने पळ काढला. चिमुरडी रडत रडत घरी आली. तिला वेदना असह्य होऊ लागल्या होत्या. मुलीची अवस्था पाहून आई-वडिलांना संशय आला. त्यांनी मुलीची विचारपूस केली. आपल्यासोबत घडलेल्या अघटीत घटनेमुळे प्रचंड भेदरलेली चिमुरडी काहीही सांगण्याच्या मन:स्थितीत नव्हती. अखेर तिने बेतलेला प्रसंग आपल्या जन्मदात्यांना सांगितला. हे ऐकून आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली.

नराधमाला पोलीस कोठडी 

त्यानंतर मुलीसह आई-वडिलांनी तालुका पोलिस ठाणे गाठून तेथील पोलिसांपुढे मुलीवर बेतलेल्या प्रसंगाची कहाणी कथन केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांनी पालकांसह पीडित मुलीला धीर दिला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी प्रथम वैद्यकिय तपासणीकरिता पीडित मुलीला रूग्णालयात पाठविले. तर दुसरीकडे पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या जबानीवरून रात्री गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या खास पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपीला काही तासांतच अटक केली. शनिवारी पोलिस बंदोबस्तात कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

7 महिन्यांत 233 अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार 

ठाणे जिल्हा शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील 5 पोलिस उपायुक्त कार्यालयांतर्गत 35 पोलिस ठाणी आहेत. या विविध पोलिस ठाण्यांत गेल्या 7 महिन्यांत 233 अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडून पोक्सो कायद्यानुसार गुन्हे दाखल करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक कल्याण पोलिस परिमंडळ 3 हद्दीत पोक्सोचे 61 गुन्हे दाखल आहेत. तर त्या खालोखाल उल्हासनगर पोलिस परिमंडळ 4 मध्ये 55, भिवंडी परिमंडळ 2 मध्ये 48, तर ठाणे शहरातील 1 आणि 5 या दोन्ही परिमंडळ 43 गुन्हे दाखल असल्याचे आकडेवरून समोर आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT