कासा : यंदा कवडास धरणातील सूर्या कालव्याच्या दुरूस्तीसाठी शेतीसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. लघुपाटबंधारे विभागाने ग्रामपंचायतींना तसे लेखी पत्र दिले आहे.
पालघर जिल्ह्यातील सूर्या नदीवरील कवडास व धामणी धरणातून उजव्या व डाव्या तीर कालव्याद्वारे डहाणू, पालघर तालुक्यातील वेती, वरोती, मुरबाड, वांगर्जे, कासा, तवा, धामटणे, पेठ, कोल्हाण, आंबेदे बर्हाणपूर, नानीवली, रावते, चिंचारे, बोरशेती तर थेरोंडा, सोनाळे, चारोटी, सारणी, रानशेत, उर्से, म्हसाड आदी गावांना उन्हाळी भात शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. यामधून जवळपास 1 हजार हेक्टरवर जमीन ओलीताखाली येते. या कालव्याच्या पाणीपुरवठ्यामधून उन्हाळी भात, भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवगड केली जाते.
मात्र गेल्या अनेक वर्षांपासून कालव्यांची दुरुस्ती न झाल्याने कालव्यांना ठिकठिकाणी गळती झाल्याने दरवर्षी हजारो लिटर पाणी वाया जाते म्हणून सूर्या डावा तीर कालव्यावर निर्मित झालेले सिंचन क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे काव्यावरील मुख्यतः कालव्याच्या शेवटच्या भागातील शेतकर्यांना सिंचनाचा पुर्णपणे लाभ देता येत नाही. यावर वेळोवेळी स्थानिक प्रतिनिधी, शेतकरी यांनी कायमस्वरूपी उपाययोजना करणेबाबत सुचवले असून कालवे दुरुस्तीची मागणीही केली होती. त्या अनुषंगाने यावर उपाय योजनेचा भाग म्हणून कालव्यावरील पाईप मोर्यांमधून होणारी पाणी गळती थांबविणे, कालव्यावरील गेटची दुरुस्ती अथवा पुनर्बांधकाम करणे, अस्तरीकरणाची दुरुस्ती करणे, खोल खोदकामात साचत असलेली माती काढून उपाय योजना करणे, कालव्याची साफसफाई करणे इत्यादी कामे उपलब्ध निधीच्या अनुषंगाने हाती घेण्यात आलेली असून काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे.
उन्हाळी भात पेरणीसाठी साधारणतः नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये शेतीला पाणीपुरवठा केला जातो. मात्र सदर कामे कालव्याच्या संपूर्ण लांबीत असून ती वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. ही कामे वेळेत पूर्ण रून शेतकर्यांना सिंचनाचा लाभ देणे शक्य होणार आहे. त्यामुळे चालू सिंचन हंगाम सन 2024-25 करिता सिंचनासाठी पाणी सोडता येणार नाही. सदर बाब ग्रामपंचायत स्तरावर शेतकर्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग मनोर यांनी डहाणू व पालघरमधील ग्रामपंचायतीना लेखी पत्र दिले आहे.