उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालय pudhari file photo
ठाणे

ठाणे : मध्यवर्ती रुग्णालयात जाणवतोय औषधांचा तुटवडा; रुग्णांची हेळसांड

थकबाकीमुळे औषध पुरवठा बंद

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर : उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात औषध बिलाची लाखो रुपयांची थकबाकी आहे, शासनाने अनुदान न दिल्याने मध्यवर्ती रुग्णालय प्रशासन पुरवठादारास थकीत बिल देण्यास असमर्थ आहे. त्यामुळे पुरवठादाराने गेल्या चार महिन्यांपासून औषधे देणे बंद केले आहे. रुग्णालयात औषधे उपलब्ध नसल्याने गरीब व आदिवासी रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.

राज्य सरकारने 15 ऑगस्ट 2023 रोजी मोफत उपचार योजना सुरू केली. ही योजना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातही सुरू करण्यात आली. दरमहा सुमारे 2000 ओपीडी रुग्ण येतात. या शिवाय मध्यवर्ती रुग्णालयात 201 खाटांचे रुग्णालय आहे. त्यामध्ये रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. या रुग्णालयात उल्हासनगर व्यतिरिक्त जवळच्या अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब व आदिवासी रुग्ण देखील उपचारासाठी येत असतात.

औषधे, प्रयोग शाळेतील रसायने व अन्य इतर सामग्रीचा खर्च 35 लाख 16 हजार 828 रुपये झाला. या रक्कमेपैकी 3 लाख 6 हजार 560 रुपये प्रयोगशाळेच्या साहित्याचा खर्च आहे. मात्र गेल्या चार महिन्यापासून शासनाने अनुदान दिले नसल्याने औषधांचा पुरवठा बंद करण्यात आला आहे.त्यामुळे रुग्णांना मोफत औषध देणे बंद करण्यात आले आहे.

25 सप्टेंबर 2024 रोजी ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक यांना लेखी माहिती दिली आहे. पूर्वी केस पेपर आणि उपचारासाठी दहा रुपये घेतले जात होते. त्यामुळे काहीतरी उत्पन्न मिळत होते. मात्र त्या नंतर सरकारने ते देखील बंद केल्याने उत्पन्नाचे स्तोत्र शिल्लक राहिलेले नाही.
डॉ मनोहर बनसोडे, अधीक्षक मध्यवर्ती रुग्णालय, ठाणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT