डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी पाच दिवसांचा अवधी लागणार होता. मात्र पुलाच्या पुनर्बांधणीचे अवजड काम नियोजित वेळेच्या एक दिवस आधीच फत्ते झाले आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. पुलाची लहान व किरकोळ स्थापत्य कामांनाही आता वेग दिला जात आहे.
पुलाखालील किरकोळ कामे असल्याने वाहतुकीचा या कामांशी संबंध नाही. त्यामुळे पुलावरील वाहतूक रात्री 12 वाजल्यापासून नियमित सुरू होऊ शकेल, असे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र रेल्वेची कामे पाहून याबाबतचा अंतीम निर्णय घेतला जाईल, असे वाहतूक नियंत्रण शाखेकडून सांगण्यात आले.
निळजे येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या पुनर्बांधणी कामासाठी कल्याण-शिळ महामार्ग गेल्या पाच दिवसांपासून वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. या महामार्गावरून फक्त हलकी वाहने धावतात. 6 ते 24 चाकी जड/अवजड वाहनांना या कल्याण-शिळ महामार्गावर बंदी आहे. मालवाहू अवजड वाहने गेल्या 5 दिवसांपासून खोणी नाका, कल्याण फाटा, मुंब्रा, खारेगाव आणि नेवाळीमार्गे सोडली जात आहेत. निळजेतील रेल्वेच्या उड्डाण पुलासाठी खोदकाम केलेल्या खाच्यामध्ये सीमेंट काँक्रीटच्या 19 भक्कम चौकटी बसविण्याचे काम पाच दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आले आहे. चौकटी बसविण्याचे आव्हानात्मक काम तीन-चार दिवसांमध्ये करण्यात आले. या 19 चौकटींंमध्ये काँक्रीट टाकून त्या बंदिस्त करण्यासह पुलाखालील चारही बाजुचा भाग बंदिस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
कल्याण-शिळ महामार्ग पाच दिवस बंद राहणार असल्याने या महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या भीतीने अनेक प्रवाशांनी पयार्यी रस्त्यांनी प्रवास करणे पसंत केले. तर काही प्रवाशांनी कोंडीत एकाच जागी तासन् तासन अडकून पडण्यापेक्षा घरातून काम करणे पसंत केले. या महामार्गावरील पलावा चौकाकडे जाणारी वाहतूक लगतच्या पलावा चौक, लोढा, निळजे, काटई, खिडकाळी भागातील रहिवाशांसाठी खुली ठेवण्यात आली होती. याच जोड रस्त्यांवरून बाहेरची देखिल हलकी वाहने धावत होती. निळजे पुलावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून हलकी वाहने काटई चौकाकडून खोणी-तळोजामार्गे सोडण्यात येत होती. काही वाहन चालकांनी मोठागाव-माणकोली पूलमार्गे, गोविंदवाडी, दुर्गाडी कोनमार्गे इच्छित स्थळी जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कल्याण-शिळ महामार्गावरील वाहनांचा भार या पाच दिवसांच्या कालावधीत कमी प्रमाणात होता. या महामार्गावर वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेच्या 150 पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. हा महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत सुरू होण्याकडे चालक, प्रवासी आणि वाहतूकदारांच्या नजरा लागल्या आहेत.
निळजे रेल्वे उड्डाणपूलाचे काम वेळेत पूर्ण करण्यात आले. पूल रहदारीसाठी खुला देखील करण्यात आला आहे. त्याबद्दल मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी रेल्वेसह राज्य शासनाचे अभिनंदन केले. मात्र नव्याने बांधण्यात येत असलेल्या पलावा उड्डाण पूलाचे काम होत का नाही ? असा सवाल उपस्थित करत राजू पाटील यांनी ट्विटद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना टिकेचे लक्ष्य केले.
टाटा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने पलावा जवळच्या निळजे पूलाचे काम डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पामधील रस्ता कटींग करुन रेल्वे ट्रॅकचे काम पूर्ण केले. पूलाचे काम पूर्ण करण्यासाठी या पूलावर पाच दिवसांकरिता वाहतूक बंद ठेवली होती. पूलाचे काम पूर्ण होताच पूलावरी रहदारी पुन्हा सुरु करण्यात आली आहे. अत्यंत काटेकोरपणे कामाचे नियोजन केले. वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनीही उत्तम काम केले. यासाठी ज्यांचे योगदान लाभले त्यांचे अभिनंदन करणे अपेक्षित असल्याचे मत माजी आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले. हे काम नियोजीत वेळेत होऊ शकते तर पलावा पूलाचे काम का होऊ शकत नाही ? असा परखड सवाल माजी आमदार पाटील यांनी उपस्थित केला आहे.
पलावा पूलाचे काम 2018 मध्ये सुरू करण्यात आले. मात्र अद्याप ते पूर्ण होताना दिसत नाही. एमएसआरडीसी आणि एमएमआरडीएची तिजोरी कल्याण-डोंबिवली आणि ठाणे महानगरपालिकेच्या तिजोरीसारखी रिकामी झाली आहे. त्यामुळे ठेकेदारांची बिले द्यायला पैसे नाहीत अशी चर्चा सुरू आहे. दुसरीकडे अशी कामे टाटा आणि एल अँड टी सारख्या कंपन्यांना न देता आपल्याच मेहूण्या-पाहुण्यांच्या शेल कंपन्यांना दिल्याने ठेकेदारावर कुणाचा दबाव नाही, हे देखील बोलले जाते. खरं खोटं त्या ठेकेदाराच्या नाथांचा नाथ एकनाथालाच माहित, अशीही टिका माजी आमदार राजू पाटील यांनी ट्विटद्वारे केली आहे.