मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी बहीणींची गर्दी दिसून येत आहे. pudhari news network
ठाणे

ठाणे : संगणकाच्या तांत्रिकी डोकेदुखीमुळे बहीण रुसली

पुढारी वृत्तसेवा

मुरबाड शहर : किशोर गायकवाड

रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर राज्य सरकारने काही दिवसाधीच योजनेचे हफ्ते महिलांच्या खात्यात वर्ग केल्याने गेल्या दोन दिवसांपासून बँकांमधील वाढलेली गर्दी कमी होतांना दिसत नाही. गेले दोन दिवस बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे बँक कर्मचार्‍यांची देखील दमछाक झालेली पाहायला मिळत आहे. मात्र या योजनेचे पैसे मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करतांना अनेक लाभार्थींना नानाविध कसरत करावी लागली असून तालुक्यातील शेकडो भगिनी अजून केवायसीच्या समस्येने त्रस्त आहेत.

बँकेच्या अटी-शर्तींनुसार कागदपत्रांची जुळवाजुळव व झेरॉक्समुळे बँकिंग हेलपाट्यांना देखील सामोरे जावे लागत आहे. तर काहीना काही त्रुटींमुळे बहुतांशी महिलांना अद्याप योजनेच्या लाभापर्यंत यशस्वी रित्या पोहोचता आले नाही. याशिवाय या योजनेच्या निकष चौकटीत न बसलेल्या अन्य महिलांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यातच, खात्यात जमा झालेले पैसे शासनाकडून काढून घेतले जाण्याची बोंब सुध्दा या गर्दीमागे असल्याची तालुक्यात चर्चा आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला पैसे काढण्यासाठी अशीच गर्दी होणार असल्यास सरकारची लाडकी बहीण योजना गर्दीच्या विळख्यात सापडली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ऑनलाइन सबमिशन प्रक्रियेपासून ते फॉर्म सरकार दरबारी मंजूर होईपर्यंत व त्यानंतर ही बँकांच्या वाढीव तांत्रिक औपचारिकता, या सर्वांचे सोपस्कार पूर्ण करून अखेर मुरबाड तालुक्यातील शेकडो लाभार्थी भगिनींनी योजनेचा लाभ मिळविला आहे.

रक्षाबंधनाला बाजारपेठा तेजीत आल्या

लाखो महिला लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये योजनेची रक्कम लवकरच जमा झाल्याने बहिणींचा यंदाच्या रक्षाबंधन सणाचा आनंद द्विगुणित झालेला पाहायला मिळत आहे. तीन हजार रुपयांची ओवाळणी खात्यात जमा झाल्यामुळे महिलांनी योजनेचा लाभ जरी महिलांना झाला असला तरी यामुळे शहर बाजारपेठेतील छोट्यामोठ्या व्यापारी वर्गात देखील समाधान दिसून येत आहे.

कोरोना महामारीच्या काळापासून मंदावलेली बाजारपेठ यावर्षी रक्षाबंधन सणात तेजीत जाणवली. सणाच्या आधीच पैसे खात्यात आल्याने मुरबाड शहरातील बाजारपेठेत महिलांनी मनसोक्त खरेदी केली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
विष्णू चौधरी (तुळई), दुकानदार मुरबाड शहर मुख्यबाजारपेठ
SCROLL FOR NEXT