आश्रमशाळा pudhari file photo
ठाणे

Thane | आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे

पुढारी वृत्तसेवा

कासा : निलेश कासट

आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून शिक्षणासारख्या दर्जेदार सुविधा विद्यार्थ्यांना प्राप्त व्हाव्यात म्हणून आश्रम शाळा संकल्पना पुढे आले या आश्रम शाळांमधून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे ऐवजी आता त्यांना सोयीसुविधांचा सामना करावा लागत आहे. त्यातच अन्नातून विषबाधा लैंगिक छळ व इतर प्रकार या आश्रम शाळांमधून घडत असल्याने आश्रम शाळांमधील विद्यार्थी असुरक्षित असल्याचे समोर येत आहे प्रकल्पातील अधिकारी वर्ग आश्रम शाळांच्या दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करत असले तरी दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सध्याच्या स्थितीवरून दिसून येत आहे.

आदिवासी विकास विभागांतर्गत ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर येथे चार अपर आयुक्त व 29 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये असून त्यांच्या मार्फत मागासवर्गीय कल्याणाच्या राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. त्यातील पालघर या स्वतंत्र आदिवासी बहुल जिल्ह्यातील आदिवासीच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक स्तर उंचवण्यासाठी डहाणू व जव्हार हे दोन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आहेत.

या प्रकल्पाअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी निवासी आश्रम शाळा हा स्वतंत्र विभाग कार्यरत असून डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत डहाणू, तलासरी, पालघर व वसई हे तालुके येतात. या प्रकल्पा अंतर्गत 33 शासकीय निवासी आश्रम शाळा, 21 अनुदानित आश्रम शाळा तर 17 शासकीय मुला- मुलीची वसतिगृह असून यामध्ये साधारण 32 हजारांच्या वर विदयार्थी शिक्षण घेऊन वसतिगृहामध्ये राहत आहेत.

आदिवासी आश्रम शाळा ह्या नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहेत, बहुतेक आश्रम शाळा ह्या शहरापासून तसेच गावापासून दूर असल्याने आश्रम शाळेत नेमकं चालतंय तरी काय? हे बहुदा अनेकांना समजत नाही. या आश्रम शाळांमध्ये आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या आदिवासी कुटूंबातील मुलं-मुली शिक्षण घेऊन निवासी राहतात. मात्र अनेकदा आश्रम शाळेतील विदयार्थ्यांचे शारीरिक व मानसिक शोषण केल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत.

तर काही असंख्य घटना ह्या आश्रम शाळेच्या स्थरावर दाबून टाकल्याचे आरोप ही झाले आहेत. त्यामुळे आश्रम शाळेतील विदयार्थी किती सुरक्षित आहेत? हा अनुत्तरीत राहिलेला प्रश्न आहे.

आश्रम शाळेच्या विदयार्थ्यांच्या शिक्षण, निवासी, सुरक्षिता व आरोग्यावर यांच्यावर आदिवासी विभागाकडून दरवर्षी हजारो कोटींचा निधी मंजूर होतो. मात्र या निधीचा वापर खरंच आदिवासी विद्यार्थ्यांवर होतोय का? आदिवासी आश्रम शाळेत नजर ठेवणारे सीसीटिव्ही कॅमेरे हे हलक्या प्रतीचे असून काही वर्षात बंद पडले असून धूळ खात पडले आहेत.

आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे अनेक बाबतीत शोषण होत असल्याचे प्रकार नेहमीच पुढे येतात. आश्रमशाळेत काही अनुचित प्रकार घडल्यावर स्थानिक पातळीवर अशी प्रकरणे संबंधित मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन मिटवते. मात्र यामध्ये आदिवासी विदयार्थी नेहमीच बळीचे बकरे ठरतात. आश्रम शाळेतील विदयार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून अद्यावत सीसीटीव्ही कॅमेरे, समुपदेशन व तक्रारपेटी,टोल फ्री नंबर आदीची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
जितू दुमाडा, सामाजिक कार्यकर्ते
आश्रम शाळेतील वर्षभरातील एक दोन घटना वगळता इतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेची काळजी घेतली जाते. आश्रम शाळा विषबाधा प्रकरणी दोषींवर कारवाई केली आहे. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबाबत आदिवासी विकास प्रकल्प कटीबद्ध आहे.
सत्यम गांधी, प्रकल्प अधिकारी डहाणू

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT