मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते भित्तीचित्रांसह प्रवेशद्वारांचे लोकार्पण (छाया : बजरंग वाळूंज)
ठाणे

Thane | डोंबिवलीचे नाव सातासमुद्रापार नेणाऱ्या रत्नांचा सन्मान

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कोल्हापूरची माती जशी पहिलवान घडवते, तशी डोंबिवलीची माती नवरत्ने घडवते, असे गौरवोद्गार डोंबिवलीचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत शुक्रवारी (दि.11) आयोजित करण्यात आलेल्या लोकार्पण सोहळ्याला जमलेल्या उपस्थित डोंबिवलीकरांशी संवाद साधला.

सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या तसेच साहित्यिक, क्रीडा, शिक्षण, धार्मिक, अध्यात्मिक, उद्योग, आदी क्षेत्रांच्या माध्यमातून डोंबिवलीचे नाव सातासमुद्रापार नेणाऱ्या महनीय व्यक्तींच्या योगदानाचा सन्मान व्हावा, त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, नव्या पिढीला प्रेरणा मिळावी या उद्देशाने डोंबिवली रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.

राज्याची सांस्कृतिक उपराजधानी अशी बिरूदावली मिळवलेल्या डोंबिवली नगरीने आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम कर्तृत्ववान रत्ने दिली आहेत. या रत्नांच्या कार्य-कर्तृत्वाची जाणीव डोंबिवलीकरांच्या मनामध्ये सदैव राहण्याच्या उद्देशाने भित्तीचित्रांच्या माध्यमांतून त्यांना मानवंदना देण्यात आली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून डोंबिवली स्टेशन परिसरात भित्तीचित्रांसह कला नगरी, एकता नागरी, नाट्य नगरी, साहित्य नगरी अशा स्टेशनच्या प्रवेशद्वारांचे लोकार्पण दसऱ्याच्या पूर्वसंध्येला करण्यात आले.

या सोहळ्याला भाजपाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक शैलेश धात्रक, विकास म्हात्रे, मंदार हळबे, विद्या म्हात्रे, विनोद काळण, मुकुंद पेडणेकर, मंदार टावरे, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि डोंबिवलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राची गडकरी यांनी सूत्रसंचलन केले.

महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून डोंबिवलीची किर्ती आहेच. त्याच सोबत साहित्य, क्रीडा, उद्योग, नाट्य नगरी म्हणूनही अनेक डोंबिवलीकरांनी अथक मेहनतीद्वारे शहराची ओळख निर्माण केली आहे. डोंबिवलीला सातासमुद्रापार घेऊन जाणारे हे डोंबिवलीकर इतरांसाठी आयडॉल असून डोंबिवलीची मातीही नवरत्ने घडवणारी असल्याचे गौरवोद्गार मंत्री रविंद्र चव्हाण यांनी उपस्थितांशी संवाद साधताना काढले. या सर्वां दिग्गजांच्या कर्तृत्वाची जाणीव डोंबिवलीकरांच्या मनात सदैव रहावी आणि डोंबिवलीकरांच्या पुढच्या पिढीला या सर्वांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने विविध क्षेत्रात नावलौकिक गाजवणाऱ्या डोंबिवलीकरांचा गौरव म्हणून डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसराचे सुशोभिकरण करून त्यांची भित्तिचित्रे लावण्यात आली आहेत.

भित्तिचित्रांनी लक्ष वेधले

शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा अशा रीतीने सन्मान करणारे आपले डोंबिवली हे देशातील पहिले शहर ठरले आहे. जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून डोंबिवलीत येणाऱ्या प्रत्येकाला ही भित्तिचित्रे बघून आपल्या शहरात देखील अशाच नावीन्यपूर्ण गोष्टी निर्माण व्हाव्यात, असे नक्कीच वाटेल. इतर शहरांमध्येही या संकल्पनेचे अनुकरण होईल असा विश्वास व्यक्त करत डोंबिवलीचा हा उज्ज्वल इतिहास आपण स्वतः जरूर पहावा, वाचावा आणि इतरांनाही सांगावा, असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी शेवटी बोलताना केले.

स्टेशन परिसराला नवी झळाळी

शिक्षण क्षेत्रात एशिया स्पर्धेत प्रथम समालोचक स्व. सुरेंद्र वाजपेयी, डेक्कन क्वीनला सायकलने हरवणारे विनोद पूनमिया, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविणारे डोंबिवलीकर भाषाप्रभू स्व. पु. भा. भावे, शास्त्रीय संगीतात प्रथमच व्हायोलीनचा समावेश करणारे पं. गजाननराव जोशी, भारतभर पदमार्गांनी हजारो किलोमीटर अंतर पादाक्रांत करणारे विद्याधर भुस्कुटे, पद्मभूषण किताबाने सन्मानित पं. उल्हास कशाळकर, स्वरमापन पद्धतीचा शोध लावणारे स्व. डॉ. गोविंद काशिनाथ केतकर, जगावेगळा अभिनय सादर करणारे तोन्से विजयकुमार शेट्टी, वसईचा किल्ला सर करताना शहीद झालेले शौर्यवीर बंधू आन आणि मान ठाकूर, 90 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीमध्ये आयोजित करण्याचा मान मिळवणारी संस्था आगरी युथ फोरम, आगरी/कोळी संगीत क्षेत्रातील अष्टपैलू कलाकार स्व. शनीकुमार शेलार, जगात शांततापूर्ण बदलासाठी धोरणात्मक संकल्पना मांडणारे संदीप वासलेकर, महामार्गांचे देशभर जाळ विणणारे स्व. दत्तात्रय म्हैसकर, आयुर्वेदिक क्षेत्रात भारताचे नाव जगात उंचवणारे स्व. गजानन पेंढारकर आदी रत्नांची भित्तीचित्रे डोंबिवलीकरांना साद घालत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT