बदलापूर : बदलापूर नगरपरिषदेच्या वतीने सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कराची बिले पाठविण्यात आली आहेत. या बिलांमध्ये संगणकीय प्रणालीच्या चुकांमुळे शहरातील सुमारे 60,000 पेक्षा जास्त मालमत्ता धारकांना सन 2023-24 च्या तुलनेत वाढीव किंमतीची चुकीची बिले पाठविण्यात आली आहेत.
सन 2024-25 मध्ये कुठल्याही प्रकारची कररचना बदल झालेले नसताना व पुर्न:मुल्यांकन करणे अपेक्षित नसताना मालमत्ता धारकांना ही वाढीव बिले पाठविण्यात आली आहेत. याबाबत नागरिकांनी सन 2023-24 मध्ये भरलेला कर व सन 2024-25 चे आलेले बिल यामध्ये तफावत असल्यास सदर कर न भरण्याचे आवाहन भाजपच्या वतीने माजी शहराध्यक्ष व माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केले आहे.
गेली चार वर्षे प्रशासकीय राजवटीच्या काळात नगरपरिषदेच्या कर विभागात प्रचंड गोंधळ असून शहरातील मालमत्ता कर धारकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कुळगाव-बदलापूर नगरपरिषद ही महाराष्ट्रातील भांडवली मूल्यावर आधारित कररचना असणारी एकमेव नगरपालिका आहे. वास्तविक महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका व महानगर पालिका यांनी ही करप्रणाली फेटाळली असताना कुळगाव-बदलापूर नगरपरिषद या योजनेबाबत का आग्रही आहे? हाच खरा प्रश्न आहे. या करप्रणाली मध्ये दर चार वर्षांनी भांडवली मूल्यावर आधारित फेरबदल करून पुर्न: मुल्यांकन करण्यात येऊन करामध्ये वाढ करण्यात येते. सन 2021-22 मध्ये या मध्ये बदल झालेला असल्यामुळे पुढील बदल हा सन 2025-26 या वर्षामध्ये होणार आहे. असे असताना यावर्षी हि वाढ करून संगणकीय प्रणालीतील चुकांमध्ये कुळगांव बदलापूर नगरपरिषदेने नागरिकांना हि भुर्दंडाची चुकीची बिले पाठविली आहे.
बिले ऑनलाईन भरण्याबाबत तर नगरपरिषद यंत्रणा पूर्णपणे कुचकामी ठरली आहे. मागील वर्षी ऑनलाईन यंत्रणा बंद असल्यामुळे नागरिकांना प्रचंड रांगेत उभे राहून बिले भरावी लागली होती. यावर्षी हाच गोंधळ चालूच आहे. ऑक्टोबर महिना आला तरी नागरिकांना अद्याप बिले देण्यात आलेली नाहीत. व जी बिले प्रिंट होऊन आली आहेत त्यात चुकीची वाढ तर करण्यात आलेली आहे. पण 2% शास्तीचा भुर्दंड नागरिकांवर लादून नगरपरिषद प्रशासन अन्याय करत आहे. त्यामुळे या बिलांमध्ये सुधारणा झाल्याशिवाय नागरिकांनी बिले भरू नयेत असे आवाहन संभाजी शिंदे यांनी केले आहे.