ठाणे : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत ठाण्याचे सोने व्हायला हवे होते, पण माती झाली आहे. माजलेल्या सत्ताधाऱ्यांचा भष्ट्राचार बोकाळला असून ठाण्याचा आका मजबूत असून न्यायालयीन चौकशी सुरु असतानाही आजही सर्रासपणे अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांचे कुणी ऐकत नाही. सत्ताधाऱ्यांनी ठाणे महापालिकेची तिजोरी लुटली असून अधिकाऱ्यांकडून पाणी विकत जात असल्याने निर्माण झालेली पाणी टंचाई, वाहतूककोंडी आणि ठाणेकरांच्या अन्य समस्या कधी सोडविणार, विचारण्यासाठी सोमवारी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि मनसे तर्फे ठाणे महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती माजी खासदार राजन विचारे, अविनाश जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली. याचा जाब ठाणेकरांच्या प्रश्नांवर एकत्रित लढा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला असून या आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी झाली आहे.
त्यानुसार आज ठाकरे शिवसेना आणि मनसेतर्फे पत्रकार परिषद घेऊन उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका करत सत्ताधाऱ्यांनी ठाणे महापालिका लुटली असून राज्य सरकारचा निधी ही कामे कागदावर दाखवून लाटल्याचा आरोपही केला. यावेळी मनसेचे माजी आमदार राजू पाटील, नेते अभिजित पानसे, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे, महिला आघाडीच्या रेखा खोपकर, अनिश गावढे, रवींद्र मोरे हे नेते उपस्थित होते.
माजी खासदार राजन विचारे आणि मनसेचे नेते राजन विचारे यांनी गेल्या अकरा वर्षात तुम्ही काय केले? अडीच वर्ष मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री असताना ठाण्यात विकास प्रकल्प राबवून नंदनवन करायला हवे होते पण झाली आहे माती अशी टीका त्यांनी केली. समृद्धीचा रस्ता झाला मात्र खारेगावचा उड्डाण पूल होऊ शकले नाही, कारण त्या ठेकेदाराला लुटून खाल्ले, त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल का करण्यात आला, असाही प्रश्न त्यांनी सत्ताधारी शिवसेनेला विचारले आहे.
कारवाईच्या दहशतीमुळे अनेकांना पक्षात घेतले जात असले तरी आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्याने रावणाविरोधात लढत राहणार आहोत. अनधिकृत बांधकामांविरोधात भाजपचे आमदार संजय केळकर हे भांडतात. सेनेसमोर भाजप हतबल झाली असून आम्ही हतबल नसल्याने आवाज बुलंद केल्याचे विचारे-जाधव यांनी सांगितले.
जितेंद्र आव्हाडांचीही साथ
मनसेसह महाविकास आघाडीचे सरकार येताच ठाणे पालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी लावून कामाला लावू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ठाणेकरांनो तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी ठाणे महापालिकेविरोधात निघणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष ऍड विक्रांत चव्हाण हे सहभागी होणार असल्याचे विचारे जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नावर स्पष्टीकरण दिले.