वाडा - मनोर महामार्गावरील पिंजाळ नदी पुलाची सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तपासणी करण्यात येत असून त्यासाठी खाजगी पथकाकडून पुलावर तपासणी यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे. करलगाव येथील देहर्जे नदीवरील पुल अशाच पद्धतीने ऐनवेळी वाहतूकीसाठी धोकादायक बनल्याने दुरुस्तीसाठी पुलावरील वाहतुकीवर बंदी घातली होती. पिंजाळ नदीवरील पुलाची अशी अवस्था होऊ नये यासाठी बहुधा ही उपाययोजना असावी.
वाडा तालुक्यातील तानसा, वैतरणा, पिंजाळ व देहर्जे या नद्यांवर जवळ्पास 75 वर्षे जुने पूल असून पिंजाळ व देहर्जे नदिवरील पूल अजूनही दुहेरी भार घेवून उभे आहेत. पुलांवर रस्त्याची झालेली दुर्दशा तसेच अति अवजड वाहनांची सतत सुरु असलेली रेलचेल व सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे असणारे दुर्लक्ष पुलांना बाधा निर्माण करीत आहेत. नुकताच देहर्जे नदीवरील पुलाची झालेली दुर्दशा हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.
पाली येथील पिंजाळ नदीवरील पुलाची अवस्था नेमकी कशी आहे व पुल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक ठरण्याच्या आधीच याचे परीक्षण करण्याची सद्बुद्धी सार्वजनिक बांधकाम विभागाला सुदैवानं सुचली असून त्यासाठी खाजगी कंपनी काम करीत आहेत. तांत्रिक पथकामार्फत पुलाचीही सविस्तर तपासणी केली जात असून पुलाचे मूल्यांकन करण्यासाठी खांब आणि गर्डरमधून काँक्रीटचे नमुने गोळा केले जातील. विशिष्ट पद्धतीने अवजड वाहतूकीसाठी हा पुल किती योग्य आहे याचे मूल्यमापन केले जाणार आहे असे पथकातील कर्मचार्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क होऊ शकला नसला तरी तालुक्यातील सर्व जुन्या पुलांची तपासणी करून अवजड वाहतुकीला पुर्णपणे मज्जाव घातला जावा अशी मागणी केली जात आहे.
शहरातील बांधकाम व्यवसायासह नव्याने उभारल्या जात असलेल्या महामार्गांसाठी वाडा तालुक्यातील विविध भागातून माती, खडी, दगड असे गौणखनिज राजरोस वाहिले जात आहे. अवजड वाहनातून यांची वाहतूक केली जात असून आरटीओ व महसूल विभाग डोळ्यांवर हात देऊन बसल्याचा आरोप केला जात आहे. तालुक्यातील मुख्य रस्त्यांसह अन्तर्गत रस्ते यामुळे संपुष्टात आले असून या वाहनांना कुणी खिळ घालील का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.