डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या एका गुंडाने हातात सुरा घेऊन डोंबिवली पूर्वेतील शेलारनाका भागात मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर दहशत निर्माण केली. यामुळे रस्त्यावरील नागरिक सैरावैरा पळू लागले. चालकांनी भीतीपोटी वाहने जागोजागी थांबविल्याने शेलार नाका भागात वाहतूक कोंडी झाली. टिळकनगर पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन या गुंडाची गठडी वळली.
हुसेन मोहम्मद पावटे (वय २८) असे या गुंडाचे नाव असून तो शेलार चौकातील इंदिरानगर झोपडपट्टीत राहतो. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या हुसेनला पोलिस उपायुक्तांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये ठाणे जिल्ह्यातील कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणे तालुक्यातून १२ महिन्यांसाठी हद्दपार केले आहे. हुसनेच्या विरोधात सरकारतर्फे टिळकनगर पोलिस ठाण्याचे हवालदार देविदास गिरासे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हुसेन पावटे याला ठाणे जिल्ह्यातून काही तालुक्यांमधून हद्दपार केले असताना देखील हद्दपारीच्या आदेशाचा भंग करून डोंबिवलीत दाखल झाला होता. त्याने पुन्हा डोंबिवलीतील शेलारनाका-इंदिरानगर झोपडपट्टी भागात आपली दहशत माजविण्यास सुरुवात केली होती. शुक्रवारी दुपारच्या सुमारास हुसेन हातात १६ इंच लांबीचा धारदार सुरा घेऊन शेलार नाका भागातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर आला. व त्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या दहशतीमुळे पादचारी जागोजागी थांबले, वाहने खोळंबून शेलारनाका भागात वाहतूक कोंडी झाली. शाळेच्या बस या कोंडीत अडकल्या.
याबाबत माहिती मिळताच टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आर. वाय. चौगुले, हवालदार एस. के. कांबळे, यु. एम. राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पथक घटनास्थळी येईपर्यंत हुसेन शेलार नाका भागातून पळून गेला होता. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने त्याचा परिसरात शोध सुरू केला. व त्याला परिसरातून ताब्यात घेतले.