ठाणे पालिकेच्या शाळा असुविधेच्या गर्तेत सापडल्या आहेत pudhari news network
ठाणे

गंभीर! तुटके बेंचेस, गळके छत अन् विनापाण्याचे शौचालय; पालिकेची शाळा असुविधांच्या गर्तेत

पुढारी वृत्तसेवा
ठाणे : प्रवीण सोनावणे

खाजगी शाळांबरोबर स्पर्धा करू पाहणार्‍या पालिकेच्या शाळा कशाप्रकारे असुविधेच्या गर्तेत सापडल्या आहेत याची प्रचिती पातलीपाडा या ठिकाणी असलेल्या महापालिकांच्या शाळांमध्ये गेल्यावर प्रकर्षाने जाणवते. या ठिकाणी असलेल्या एकाच इमारतींमध्ये तब्बल 4 शाळा भरत असून या चारही शाळांची पटसंख्या ही जवळपास 1700 वर आहे. यामुळे प्रत्येक वर्गात एका बेंचवर अक्षरशः तीन तीन मुलांना दाटीवाटीने बसवले जात आहे. वर्गखोल्या वाढवण्यासाठी या परिसरातील दक्ष नागरिक गेले दोन वर्ष ठाणे महापालिकेकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र आश्वासनांच्या पलिकडे पालिकेने या दोन वर्षात काहीच दिलेले नाही. त्यात ज्या इमारतीमध्ये या शाळा भारतात त्या इमारतीमधील असलेल्या असुविधा हा तर गंभीरच प्रश्न आहे.

शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक. शाळेतल्या आठवणी आयुष्यभर जपल्या जातात. मात्र ठाणे महापालिकेच्या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे भविष्य शाळेतील असुविधांमुळे अंधारात असल्याचे पाहायला मिळत आहे.ठाण्यातील घोडबंदर पातलीपाडा परिसरात असलेली पालिकेची शाळा ही ग्रामपंचायत काळातील अतिशय जुनी शाळा आहे.महापालिका अस्तित्वात आल्यानंतर ही शाळा महापालिकेकडे सोपवण्यात आली. मात्र असुविधांचा सामना करत विद्यार्थ्यांना या ठिकाणी ज्ञानाचे धडे घ्यावे लागत आहेत. तळ अधिक 2 मजल्याची ही इमारत असून या ठिकाणी शाळा क्रमांक 54, 53, 25, 21 अशा चार शाळा भरतात. प्रत्येक वर्गात 60 विद्यार्थी जरी धरले तरी ही संख्या 1700 च्या घरात जाते. या ठिकाणी मराठी,हिंदी आणि इंग्रजी तसेच माध्यमिकचे वर्ग देखील भरतात. मात्र विद्यार्थ्यांच्या तुलनेत जागा अतिशय अपुरी पडत असल्याने मुलांना बसवायचे कुठे असा प्रश्न या शाळेतील शिक्षकांना पडला आहे.

पालकेच्या शाळेतील तुटके बेंचेस असून त्यावर तीन तीन विद्यार्थ्यांना दाटीवाटीने बसविले जाते.

ठाणे महापालिकेच्या शाळेत विद्यार्थी पट नसल्याची ओरड सातत्याने होत असते. मात्र ज्या शाळेत विद्यार्थी शिकतात त्याच शाळेत विद्यार्थ्यांना कोणतीही सुविधा मिळत नसून सातत्याने पाठपुरावा करणार्‍या समाज सेवकांना देखील ठाणे पालिकेचे अधिकारी दाद देत नाहीत. गेले अनेक वर्ष या शाळेसाठी सामाजिक कार्यकर्ते डी.जे.बक्षी यासाठी पाठपुरवठा करत आहेत. मात्र त्यांनाही प्रशासन दाद देत नाही. या शाळेतील विद्यार्थी अतिशय चांगले मार्क मिळवून पास होतात. आणखी जर लक्ष दिलं तर आणखीन हुशार विद्यार्थी शाळेत घडतील . शाळेच्या छतावर जर व्यवस्थित सोय केली तर चार ते पाच खोल्या तयार होऊ शकतात. काही विद्यार्थी बसवण्याची सोय होऊ शकते. शाळेत असलेले रॅबिट देखील यांनी उचलले नाही यामुळे मागची बाजू शाळेची वर आली असून शाळेत पावसात पाणी शिरण्याची देखील शक्यता आहे. शाळेच्या जिन्यावरील लाद्या तुटल्या असल्याने विद्यार्थी पडण्याची भीती आहे. अनेक ठिकाणी भिंतीना गळती लागली आहे. शौचालयाची दारे तुटली आहेत.

याच शाळेची माजी विद्यार्थी असलेले श्रावण मोहोळे यांनीही पाठपुरावा करून ही शाळा दहावीपर्यंत केली.शाळा तर दहावी पर्यंत झाली मात्र विद्यार्थ्याना बसायला जागा नाही तर शाळेत साधी प्रयोगशाळा देखील नाही. या शाळेत शिकणारे विद्यार्थी उद्याची स्वप्न डोळ्यात साठवून शाळेत येत आहेत. मात्र शाळेत आल्यानंतर बसायला जागा नसणे, तुटलेली शौचालयाची दारे, शौचालयात पाणी नसणे, तुटलेले बेंच, गळक्या भिंती या वास्तव परिस्थितीमुळे सरकारी शाळा केव्हा सुधारणार असा प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित होत आहे.

कोट्यवधी रुपयांची तरतूद शाळांसाठी केली जाते. मात्र हे पैसे जातात कुठे असा सवाल उपस्थित होतो आहे. परिसरातील स्थानिक नगरसेवक आणि सत्तेवर जे बसले आहेत त्यांनी याची दखल घेणे आवश्यक आहे. मात्र तसे प्रत्यक्षात होताना दिसत नाही. त्यामुळे आता यासाठी रस्त्यावरच उतरावे लागण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
डी. जे. बक्षी, सामाजिक कार्यकर्ते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT