पहिल्यांदा श्वान आणि दुसर्‍या वेळी मांजर चावल्यानंतरही शुभम मनोज चौधरी याने दुर्लक्ष केले. एकीकडे हाच हलगर्जीपणा तरूणाच्या जीवावर बेतला आहे.  Pudhari News network
ठाणे

Thane Stray Animals | भटक्या श्‍वानानंतर मांजरीचा चावा जीवावर बेतला

कल्याणातील तरुणाचा हलगर्जीपणामुळे मृत्यू; चार रुग्णालयांतील उपचार ठरले नाकाम

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : श्वान चावल्यानंतर तरुग्णावर तातडीने उपचार करणे आवश्यक असते. मात्र दुर्लक्ष केल्यास रूग्णाच्या जीवावर बेतू शकते. अशीच एक घटना कल्याणात उघडकीस आली आहे. एका तरूणाला महिन्यांपूर्वी भटक्या श्वानाने चावा घेतला. त्यानंतर आठवडाभरानंतर मांजर चावली. पहिल्यांदा श्वान आणि दुसर्‍या वेळी मांजर चावल्यानंतरही तरूणाने दुर्लक्ष केले. एकीकडे हाच हलगर्जीपणा तरूणाच्या जीवावर बेतला आहे.

भटक्या श्वानांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रेबीजचा प्रदुर्भाव झाल्याची लक्षणे आढळून आल्यानंतर या तरूणावर कल्याणपासून मुंबईपर्यंत चार रूग्णालयांत दाखल केले. तरीही त्याच्यावरील उपचार नाकाम ठरले.

शुभम मनोज चौधरी (27) असे या तरूणाचे नाव असून तो कल्याण पश्चिमेकडे बेतुरकरपाड्यातल्या गोल्डन पार्क गृहसंकुलात कुटुंबासह राहत होता. शुभमचे वडील मनोज चौधरी हे घाटकोपर येथील एका खासगी मेडिकल दुकानात नोकरी करतात. शुभमने शिक्षण पूर्ण केले असून तो नोकरीच्या शोधात होता. दोन महिन्यांपूर्वी शुभम रात्री राहत्या घराच्या इमारतीखाली फेरफटका मारण्यासाठी गेला होता. एका भटक्या कुत्र्याने शुभमला चावा घेतला. कुत्रा चावल्याने त्वचेवर व्रण उठले नाहीत आणि रक्तप्रवाह झाला नाही. त्यामुळे कुत्र्याचा चावा किरकोळ असल्याचे समजून शुभमने तेव्हा उपचार घेणे टाळले.

त्यानंतर मागच्या आठवड्यात मित्राच्या घरी गेला असता तेथील एका मांजरीने शुभमला चावा घेतला. तो चावाही किरकोळ असल्याचे समजून त्याने उपचार केले नाहीत. तथापी 10 डिसेंबर रोजी शुभमची प्रकृती बिघडली. डोकेदुखी, अंगदुखी, पाण्याची भिती, घशाला कोरड पडणे, अशी लक्षणे आढळून आल्याने घरच्यांनी उपचारासाठी त्याला प्रथम कल्याणमधील खासगी रूग्णालयात नेले. तेथून केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात हलविले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. तेथेही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला मुंबईतील कस्तूरबा रूग्णालयात नेले. उपचार घेत असताना 12 डिसेंबर रोजी सकाळी 6.50 वाजता शुभमचा मृत्यू झाला.

शुभम चौधरी याला सुरूवातीला श्वानाने चावा घेतला. परंतु रक्तप्रवाह झाला नाही. तसेच श्वान दंशाचे व्रण किंवा जखम नसल्याने सदर रूग्णाने औषधोपचार घेतले नाही. मांजर चावली तेव्हा देखील रूग्णाने कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन घेतले नाही. वेळीच उपचार न घेतल्यामुळे हा रूग्ण दगावल्याचे स्पष्टीकरण कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रमुख वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT