ठाणे : ठाण्यात क्रिडा संस्कृती रुजावी, क्रिडापटु तयार व्हावेत या उद्देशाने 104 खेळाची मैदाने शहरात होती. मात्र काळाच्या ओघात अतिक्रमण आणि व्यापारीकरणामुळे खेळण्यासाठी मैदानेच उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर आले आहे. ठाणे महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप करीत ठाणे सिटिझन्स फाऊंडेशनने मैदाने वाचवण्यासाठी दंड थोपटले असुन न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.
तलावांचे शहर असलेल्या ठाण्यात पूर्वी मुबलक मैदाने होती, मात्र, आता सेंट्रल मैदान, साकेत मैदान,पोलीस परेड ग्राऊंड, गावदेवी मैदान अशी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच मैदाने शिल्लक आहेत. पूर्वी ठाण्याच्या मैदानामध्ये सर्कशी तसेच मोठमोठे सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. आता मैदानामध्ये पाण्याच्या टाकी किंवा अन्य बिनकामाच्या विकासकामांची भाऊगर्दी दिसत आहे. शहरीकरणामुळे वाहनांची संख्या वाढल्याने पार्किंगच्या नावाखाली काही मैदानांचे लचके तोडल्याने मैदानाचा आकार आकुंचित पावला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात 104 मैदाने आरक्षित आहेत. परंतु ही मैदाने विकासकांच्या घशात गेली आहेत. अनेक मैदानांवर झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण झालेले आहे, तर अनेक दुर्लक्षित असल्याने तेथे कचरा, गटाराचे पाणी आणि झाडाझुडपांचे साम्राज्य पसरलेले आहे. देखभालीचा खर्च परवडत नसल्याचे कारण पुढे करून ठाणे महापालिकेने काही मैदाने खाजगी व्यावसायिक, संस्थांना दिली आहेत. त्यांच्याकडून लग्न, पार्ट्या, मोठ्या समारंभासाठी मैदाने भाड्याने दिली जातात, खेळाचा उद्देश बाजूला पडुन मोठा नफा कमावला जात आहे.
मोबाईल, टीव्हीपासुन बच्चे कंपनीला दुर ठेवण्याचे सल्ले दिले जातात पण कृती शुन्य कारभार सुरू आहे. तेव्हा, ठाण्यातील नागरिकांच्या हक्काची मैदाने वाचवण्यासाठी ठाणे सिटिझन्स फाउंडेशनने दंड थोपटले आहेत. 2014 पासून त्यांचा विविध स्तरावर लढा सुरू आहे. ठाणे महापालिका ते थेट क्रीडामंत्री, मुख्यमंत्र्यांपर्यंत साकडे घातले. मात्र, अद्याप त्यांना या लढ्यामध्ये यश येताना दिसत नसल्याने या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
एकीकडे ठाणे स्मार्ट सिटी म्हणून नावारूपास येत असताना दुसरीकडे मैदानाविना ठाणेकरांचे आरोग्य संकटात सापडले आहे. क्रिडा विभागाच्या निर्देशानुसार प्रत्येक वसाहतीनजीक मैदाने असावीत. पण अनेक खेळाच्या जागा ठाणे महापालिकेच्या ताब्यातच नाहीत. या मुलभूत सुविधेकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.कॅस्बर ऑगस्टीन, अध्यक्ष, ठाणे सिटिझन्स फाऊडेशन.