डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी रस्ते संपूर्ण स्वच्छ करून धुळमुक्त करण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने विशेष मोहीम हाती घेतली आहे. आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या निर्देशांनुसार, तसेच अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 5 डिसेंबरपासून महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मुख्य रस्ते रात्रपाळीत स्वच्छ करण्यात येत आहेत.
कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात हवेची गुणवत्ता ढासळल्याने रहिवाशांना श्वसनाच्या वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच धुळीची समस्या जटील झाली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे.
त्यानुसार शहरांतील 23 रस्ते पॉवरस्वीपर मशीनद्वारे, तर 57 रस्ते मनुष्यबळाद्वारे रात्रपाळीत सहाय्यक आयुक्त प्रिती गाडे, मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलुरकर, परिमंडळ - 1 चे उपमुख्य स्वच्छता अधिकारी मोहनीश गडे, परिमंडळ - 2 चे उपमुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र खैरे यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छ करण्यात येत आहे.
प्रभाग क्षेत्र स्तरावर सुरु असलेल्या रात्रपाळीत कामाची गुणवत्ता तपासण्याकामी 1/अ प्रभाग क्षेत्रातील मोहने गेट, 2/ब प्रभाग क्षेत्रातील प्रेम ऑटो ते व्हटेक्स, खडकपाडा ते झुलेलाल चौक, 8/ग प्रभाग क्षेत्रातील इंदिरा गांधी चौक ते गावदेवी मंदिर परिसर, तसेच कल्याण मलंगगड रोड या परिसरात अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, सहाय्यक आयुक्त प्रिती गाडे यांच्यामार्फत 6 ते 7 डिसेंबर या कालावधीत रस्ते सफाई दरम्यान भेट देऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी करण्यात आली. कार्यवाही दरम्यान येणाऱ्या अडचणींबाबत संबंधीत स्वच्छता अधिकारी, स्वच्छ्ता निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून कामाची गुणवत्ता वाढविण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या.
ही कार्यवाही 4 पॉवर स्वीपर वाहने व 200 मनुष्यबळाच्या साह्याने करण्यात येत असून प्रत्यक्ष कामाचे नियोजन करण्यासाठी संबंधीत परिसरातील स्वच्छता निरिक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कार्यवाही दरम्यान आतापर्यंत जवळपास 15 टन धूळ व माती, तर रस्त्यावरील जवळपास 150 टन कचरा उचलण्यात आला आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या धूळ क्षमण वाहनांमार्फत देखील नियोजनबध्द कार्यवाही करण्यात येत आहे. यामुळे महापालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीमुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होण्यास मदत झाली आहे. ही कार्यवाही यापुढेही सुरू राहणार असल्याचे माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी सांगितले.