MSEDCL smart meter pudhari photo
ठाणे

Thane Smart Meter Controversy: स्मार्ट मीटरवरून नवा वाद! रहिवासी झोपेत असताना बाहेरून कडी लावून बसवले स्मार्ट मीटर

ठाण्यात स्मार्ट मीटरसाठी गृहसंकुलांचा वीजपुरवठा खंडित

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ठाण्याच्या सावरकरनगरमध्ये दुपारी रहिवासी झोपले असताना घराला बाहेरून कडी लावून लपत-छपत स्मार्ट मीटर लावण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एवढेच नव्हे, तर स्मार्ट मीटर लावण्यासाठी घोडबंदरवरील एका संकुलातील सहा इमारतींचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर केवळ व्यापारी संकुल, आस्थापनांना लावला जाईल, सामान्य ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविले जाणार नाहीत, असे विधिमंडळाच्या अधिवेशनात आश्वासन देऊन विरोधकांना धारेवर धरले होते.

तेच मुख्यमंत्री फडणवीस आता स्मार्ट मीटर अनिवार्य आहे, असे सांगू लागल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. स्मार्ट मीटरमुळे वाढीव बिल येत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे स्मार्ट मीटरला तीव्र विरोध होऊ लागला आहे.

त्यामुळे महावितरण कंपनीने अदानी कंपनीचे हे खासगी मीटर ग्राहकांच्या माथी मारण्यासाठी नवीन परिपत्रक काढून दबाव टाकत आहे. ज्या गृहनिर्माण संकुलात स्मार्ट मीटर लावले जात नाहीत त्याचा वीजपुरवठा खंडित करण्याचा अन्यायकारक प्रकार सुरू आहे.

स्वा. सावरकरनगरमधील डेनिस कंपाऊंडमध्ये मंगळवारी रहिवासी दुपारच्या वेळेस झोपेत असताना दरवाजाला बाहेरून कडी घालण्यात आली. पाठोपाठ जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर लावल्याचा प्रकार घडला.

सायंकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर रहिवाशांनी महावितरणचे अधिकारी तोडकर यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. या प्रकाराची चौकशी केली जाईल, मी सध्या पुण्यात आहे, असे त्यांनी रहिवाशांना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT