ऑनलाईन लूट Pudhari Photo
ठाणे

ठाणे : ऑनलाईन खरेदी? शॉपिंग उत्सवाच्या नावाने फसवणूकीचे मायाजाल

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : नवरात्र, दसरा, दिवाळी, ईद आदी सणांच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शॉपिंगकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ई-वाय-आयव्हीसिए ट्रेंड बुकच्या एका रिपोर्टनुसार 2024 पर्यन्त ई शॉपिंग करणार्‍या भारतीयांमध्ये 27 टक्क्याने वाढ होणार आहे. तर ई - कॉमर्सचा एकूण व्यवसाय या वर्षाअखेर तब्बल शंभर अरब डॉलरपर्यंत पोहचण्याची शक्यता देखील या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आली आहे. या आकडेवारीवरूनच ऑनलाईन शॉपिंचा बाजार किती झपाट्याने वाढतोय याचा अंदाज येतो.

ऑनलाइन शॉपिंगच्या वाढत्या लोकप्रियतेचा फायदा उचलून ग्राहकांची फसवणूक करणार्‍या बनावट ई कॉमर्स कंपन्यांचा देखील सर्वत्र सुळसुळाट वाढलेला दिसून येतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध बनावट उत्पादनांची जाहिरात करून ग्राहकांची फसवणूक करणार्‍या टेलीशॉपिंग कंपन्यांच्या विरोधात गेल्या वर्षभरात राज्य सायबर पोलिसांकडे दोन हजारहून अधिक तक्रारींची नोंद करण्यात आली आहे.

सध्या सणांचा उत्साह सर्वत्र दिसून येतोय. नवरात्र, दसरा, दिवाळी, ईद आदी सणासुदीची धामधूम सुरू झाली आहे. घराघरात सणांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. अनेकांनी तर ऑनलाइन खरेदीला देखील सुरुवात केली आहे. ई कॉमर्स कंपन्यांनी देखील सणाच्या काळात अनेक ऑफर्स व ऑनलाइन सेल जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ऑनलाईन खरेदी करणार्‍या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ईवाय-आयव्हीसिए ट्रेंड बुकच्या रिपोर्टनुसार 2024 या वर्षात ऑनलाइन खरेदी करणार्‍या ग्राहकांमध्ये 27 टक्क्यांनी वाढ होणार आहे. दरम्यान, प्रचंड झपाट्याने वाढत असलेल्या ऑनलाईन शॉपिंगचे फॅड ओळखून अनेक सायबर गुन्हेगारांनी या मार्केटवर आपली नजर रोवली आहे.

सोशल मीडिया मार्केटिंगमधून ग्राहकांना गंडा

ऑनलाइन शॉपिंगकडे ग्राहकांचा वाढता कल ओळखून अनेक सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा बाजार उभा केलाय. या सायबर ठगांनी काही बनावट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उदयाला आणले असून त्यांनी अनेक नागरिकांची फसवणूक सुरू केली आहे. या बनावट वेबसाईट्सच्या माध्यमातून ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

सोशल मीडिया मार्केटिंगचा वापर करून अशा वेबसाईट्स ग्राहकांना गंडा घालत आहेत. ऑनलाइन पेमेंट स्वीकारून वस्तू ग्राहकांना न पाठवणे, नकली वस्तू पाठवणे, आकर्षक ऑफर्सचे आमिष दाखवून ऑनलाइन पेमेंट वळते करणे अशा अनेक फसवणुकीच्या पद्धती या सायबर गुन्हेगारांनी शोधून काढल्या आहेत. ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात राहणार्‍या एका 45 वर्षीय नोकरदार महिलेने ऑनलाईन पेमेंट करून खरेदी केली. मात्र, त्यांना ऑर्डरची डिलिव्हरीच मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनवर 15 हजार तक्रारी

ठाण्यात गेल्या वर्षभरात ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणुकीच्या दोनशेहून अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध बनावट उत्पादनांची जाहिरात करून ग्राहकांची फसवणूक करणार्‍या टेलीशॉपिंग कंपन्यांच्या विरोधात गेल्या वर्षी राज्य सायबर पोलिसांकडे दोन हजाराहुन अधिक तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनवर सहा महिन्यात तब्बल 15 हजार तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. या आकडेवारीवरून ई कॉमर्स क्षेत्रात फसवणुकीचा बाजार देखील झपाट्याने फोफावत असल्याचे स्पष्ट होत आहे.

फसवणुकीचा बाजार

ऑनलाईन फसवणुकीत ग्राहकांना नकली वस्तू पाठवणे, पैसे स्वीकारून देखील कुठलीही वस्तू न देणे, जाहिरातीत दाखवलेल्या वस्तू पेक्षा कमी दर्जाची वस्तू पाठवणे आदी प्रकार घडतात. या कंपन्या आपल्या उत्पादनाची जाहिरात करतांना कुठलाही पत्ता त्यात देत नाही तर फक्त काही दूरध्वनी क्रमांक अथवा ऑनलाइन पेमेंटची लिंक दिलेली असते. बहुतांश फोन क्रमांक बनावट कंपन्यांच्या नावावर घेतलेली असतात किंवा टोल फ़्री क्रमांक हा इंटरनेट कॉल्स सिस्टीमच्या माध्यमातून हाताळण्यात येतो. अशा वेळी या कंपन्यांचे कार्यालय कुठे आहे व कुठे बसून हे कॉल्स घेतात याचा शोध घेणे तपास यंत्रणांना कठीण जाते.

सतर्कता बाळगा फसवणूक टाळा

ऑनलाइन शॉपिंग करताना फसवेगिरी टाळण्यासाठी योग्य माहिती मिळवणे आणि सावधानता बाळगणे हे फार महत्वाचे ठरते. इंटरनेट कनेक्शन सेक्युअर आहे का ते पाहणे, वस्तूंच्या किमतीची खातरजमा करून घेणे, नेटबँकिंग किंवा डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन पेमेंट करतांना सावधानता बाळगणे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे नवीन वेबसाईटवरून खरेदी करत असल्यास ती वेबसाईट तपासणे फार गरजेचे आहे. वेबसाईटचे रँकिंग आणि पुनरावलोकन तपासणे देखील फसवणूक टाळू शकते असे सायबर तज्ञ सल्ला देतात.

तक्रार कुठे आणि कशी करावी?

ई कॉमर्स वेबसाईटच्या माध्यमातून होणारी फसवणूकीची तक्रार माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत दाखल करण्यात येतात. मात्र, बहुतांश वेळा पोलीस ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करून घेत नाही. अशा वेळी ग्राहक तक्रार मंच अथवा इतर ठिकाणी तक्रार करण्याचा पर्याय पोलीस सुचवतात आणि तक्रार घेण्यास नकार देतात. त्यामुळे अनेक फसवणूक झालेल्या नागरिकांना तक्रार कुठे करावी हेच माहिती नसते. फसवणूक झालेल्या व्यक्तीला स्थानिक पोलीस, सायबर सेल, ग्राहक तक्रार मंच आदी ठिकाणी प्रत्येक्ष तक्रार नोंदवता येते. तर फ्रॉड करणार्‍या विरोधात ऑनलाइन देखील ग्राहकांना करता येते. राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांकावर देखील तक्रार करता येते. याव्यतिरिक्त कस्टमर हेल्पलाईन डॉट गव्हरमेंट डॉट इन वर ऑनलाइन तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सायबर क्राईम विभागाच्या वेबसाईटवर देखील ग्राहक ऑनलाइन तक्रार दाखल करू शकतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT