पनवेल कनिष्ठ न्यायालय Pudhari News network
ठाणे

Thane | धक्कादायक ! पनवेलमध्ये न्यायाधीशांच्या बोगस सह्या

संशयीत आरोपी कारकुनाच्या अटकेनंतर २ वकीलही गजाआड; आरोपींना नऊ दिवसांची पोलीस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : न्यायाधीश, न्यायालय अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक यांच्या बोगस सह्या तसेच न्यायालयाचे शिक्के मारून बोगस वारस दाखले बनवणारा पनवेल कनिष्ठ न्यायालयातील वरिष्ठ कारकून दीपक फड याला गेल्या २३ डिसेंबर रोजी पनवेल पोलिसांनी अटक केल्यावर त्यांच्या चौकशीत प्राप्त माहिती नुसार या प्रकरणात सामिल असलेल्या योगेश केळकर आणि अमर पटवर्धन या दोघा वकिलांना देखील पनवेल पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपासात आणखी आरोपी गजाआड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अटक करण्यात आलेल्या योगेश केळकर आणि अमर पटवर्धन या दोघा वकीलांना पनवेल न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने दोघांनाही नऊ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोन वकिलाच्या अटके नंतर या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. या नंतर कोणाचा नंबर लागेल, याची चर्चा सर्वत्र आहे. या दोन वकील आरोपीसह कारकून आरोपी दीपक फड याने किती बोगस दाखले बनवले आहेत याचा कसून शोध आता पनवेल पोलिस घेत आहेत.

पनवेल येथील दिवाणी न्यायालयात कार्यरत असलेल्या वरिष्ठ लिपिक दीपक मोहन फड (३२) याला अटक करून त्याची चौकशी केली असता त्याने पनवेल दिवाणी न्यायालयात दाखल होणाऱ्या वारस दाखल्यांच्या चौकशी अर्ज प्रकरणांमध्ये बोगस चलन बनवून त्या माध्यमातून त्याने लाखो रुपयांचा अपहार केल्याचे देखील उघडकीस आले आहे. त्यामुळे पोलिसांनी फड याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करून त्याची कसून चौकशी सुरू केली आहे.

गेल्या महिन्यामध्ये पनवेल येथील दिवाणी न्यायालयात एका वकिलाने दिवाणी चौकशी अर्ज क्र.११३/२०२२ मधील आदेशाच्या नकलेची सत्यप्रत मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक प्रवीण बांदिवडेकर यांनी नक्कल अर्ज रजिस्टरची पडताळणी केली असता त्याची नोंद नक्कल अर्ज रजिस्टरमध्ये नसल्याचे आढळून आले. हे प्रकरण मृत नारायणदास छोटेलाल गुप्ता यांच्या मालमतेसंदर्भात वारस दाखला मिळविण्यासाठी असल्याचे तसेच सदर दिवाणी चौकशी अर्ज प्रकरण ५ वे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, पनवेल यांच्या न्यायालयात प्रलंबित असल्याचे आढळून आले. अधिक पडताळणी दरम्यान, या नकलेच्या (६५८६/२०२३) अर्जावरील आदेषावर ५ वे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, पनवेल यांची तसेच सहाय्यक अधीक्षक प्रवीण बांदिवडेकर यांच्या बोगस सह्या व न्यायालयाचे बनावट शिक्के असल्याचे आढळून आले होते.

बोगस चलन बनवून लाखोंचा अपहार

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसात दाखल गुन्ह्यानंतर पोलिसांनी दीपक फड याला अटक केली. यानंतर त्याची चौकशी केली असता त्याने पनवेल दिवाणी न्यायालयात दाखल होणाऱ्या वारस दाखल्यांच्या चौकशी अर्ज प्रकरणांमध्ये बोगस चलान बनवून त्या माध्यमातून त्याने लाखो रुपयांचा अपहार केल्याचे देखील उघडकीस आले. त्यांच सर्व बोगस दाखल्यांची चौकशी सध्या पनवेल पोलीस करित असून ती पूर्ण झाल्यानंतरच हा नेमका किती रकमेचा अपहार आहे हे स्पष्ट होऊ शकणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT