डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मधील सुदेवी केमिकल कंपनीत रविवारी (दि.6) रात्री एका 17 वर्षीय कामगाराला विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी या मृत कामगाराच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी सदर कंपनीच्या मालक/चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
डोंबिवली येथील एमआयडीसीतील फेज दोन मधील सुदेवी केमिकल कंपनीत रविवारी (दि.6) रात्री एका १७ वर्षाच्या अल्पवयीन कामगाराला विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी या मृत कामगाराच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी या कंपनीचे मालक, चालकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
सूर्यदेवकुमार छठू साह (17) असे मृत अल्पवयीन कामगाराचे नाव आहे. जितेंद्र अग्रवाल हे सुदेवी केमिकल कंपनी चालकाचे नाव आहे. मयत सूर्यदेवकुमार याचा भाऊ बिकीकुमार साह (21) याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साह कुटुंब कल्याण पूर्वेतील पिसवली भागातील शांतीनगर झोपडपट्टीत राहते.
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार बिकीकुमार याचा भाऊ सूर्यदेवकुमार हा डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मधील सुदेवी केमिकल कंपनीत कामाला होता. रविवारी रात्रीच्या वेळेत कंपनीत काम करत असताना सूर्यदेवकुमार याला विजेचा जोरदार धक्का लागला. त्याचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती साह कुटुंबीयांना कळताच ते कंपनीत दाखल झाले.
कंपनीच्या मालक आणि चालकांच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याने त्यांनी कंपनी मालक/चालकांविरूध्द मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अल्पवयीन कामगारास कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र तरीही सुदेवी कंपनीच्या व्यवस्थापनाने त्याला कामावर ठेवून कसे घेतले ? आदी प्रश्न पोलिसांकडून उपस्थित करण्यात आले आहेत. किशोरवयीन कामगारास कामावर ठेऊन कंपनीने निष्काळजीपणाचे कृत्य करून, सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेतल्याने सूर्यदेवकुमार याचा मृत्यू झाल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय सानप या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कल्याण-डोंबिवलीतील हॉटेल्स, ढाबे, बार अँड रेस्टॉरंट, छोट्या-मोठ्या फॅक्टऱ्या, बेकऱ्या, दुकाने, इमारतींचे बांधकाम, अशा ठिकाणी अल्पवयीन कामगार मोठ्या संख्येने काम करताना आढळून येतात. सुदेवी कंपनीत अल्पवयीन कामगार काम करत आहे हे कंपन्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या औद्योगिक निरीक्षक, औद्योगिक सुरक्षा, आरोग्य विभाग आणि कामगार अधिकाऱ्यांच्या का निदर्शनास आले नाही. शासनाने वेळीच या कंपनीच्या चालक/मालकावर कारवाई का केली नाही ? असे सवाल सूर्यदेवकुमार साह याच्या मृत्यूनंतर उपस्थित झाले आहेत.
बालकामगार प्रतिबंधक कायद्यान्वये 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीनांना धोकादायक नोकऱ्यांमध्ये काम करणे बेकायदेशीर ठरते. कार्यपद्धती ज्यांना प्रतिबंधित नाही अशा प्रकरणांमध्ये त्यांच्या कामाच्या परिस्थितीचे नियमन देखील करतात. कायद्याचे उल्लंघन करून नियोक्त्याने किशोरवयीन मुलांना कामावर ठेवणे दखलपात्र गुन्हा आहे. सुरळीत काम करण्यासाठी प्रत्येक संस्थेने या कायद्याचे पालन केले पाहिजे. अस्थापनांमध्ये बालकामगार आढळल्यास व्यवस्थापन संस्थेवर कठोर कारवाई करण्यात येते. मात्र कल्याण-डोंबिवलीत सर्व नियम आणि कायदे फाट्यावर मारून शिक्षणाच्या वयातील मुलांकडून जड/अवजड कामे करवून त्यांची पिळवणूक केली जाते. मात्र याकडे शासनाच्या कामगार खात्याचे सपशेल दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.