Notice Pudhari
ठाणे

Shivai Nagar Eviction Notice: पडताळणी न करताच पालिकेची घरे खाली करण्याची नोटीस

नगरसेविका परिषा सरनाईक यांच्या दणक्यानंतर प्रशासनाकडून नोटीस मागे

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: शिवाई नगर येथील एका इमारतीच्या संदर्भात आलेल्या तक्रारीच्या आधारावर ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीच्या वतीने या इमारतीमधील रहिवाशांना थेट घरे खाली करण्याची नोटीस दिली होती. मात्र आलेल्या तक्रारीची पडताळणी न करताच नोटीस कशी दिली असा प्रश्न उपस्थित करत स्थानिक नगरसेविका परिषा सरनाईक यांनी रहिवाशांसोबत थेट वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयात धडक देऊन प्रशासनाला जाब विचारला.

अखेर तक्रारीमध्ये काहीच तथ्य नसल्याची कबुली सहाय्यक आयुक्तांनीच दिल्यानंतर या इमारतीमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र अशाप्रकारे नोटीस काढून रहिवाशांना वेठीस धरणाऱ्या सहाय्यक आयुक्तांवर कारवाई करावी अशी मागणी नगरसेविका सरनाईक यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.

शिवाईनगर मधील अथर्व को-ऑप.हौ. सोसायटीच्या इमारतीचे बांधकाम सन १९९३-९४ मध्ये करण्यात आलेले आहे. या इमारतीला लागूनच हेमंत महाले यांनी अनधिकृतरित्या पत्र्याचे शेड असलेल्या गोडावूनमध्ये ब्रिल्ककिट वेअर हाऊसचा व्यवसाय चालू केल्यामुळे तेथील मोठ-मोठ्या ए.सी. च्या आवाजाने इमारतीमधील रहिवाश्यांना त्रास होत असल्याने रहिवासी वारंवार वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये जाऊन तक्रार करत होते अशी माहिती नगरसेविका सरनाईक यांनी दिली आहे.

सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत महाले यांनी उभारण्यात आलेली इमारतीची जागा ही माझ्या मालकीची आहे असे सांगून वर्तकनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त गणेश चौधीर यांच्याशी संगनमत करून व दबाव आणून महानगरपालिके तर्फे ’इमारतीतील रहिवाशांनी १५ दिवसात घरे खाली करावीत“ अशी नोटीस बजाविण्यात आली होती अशी माहिती त्यांनी दिली.

महानगरपालिकेची नोटीस आल्यामुळे इमारतीमधील रहिवाशी त्रासलेले होते. त्यामुळे स्थानिक रहिवाशी वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये जाण्यासाठी घाबरत होते. त्यांनी न्याय मागण्यासाठी स्थानिक नगरसेविका म्हणून त्यांनी माझ्याशी संपर्क केला असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. गेल्या ६ महिन्यांपासून त्या अधिकाऱ्यांना फोनवरून विचारत होत्या की, तुम्ही ही नोटीस का दिलीत? परंतु, अधिकार्यांकडून कोणतिही ठोस उत्तरे दिली जात नव्हती.

अखेर, मंगळवारी सरनाईक यांनी इमारतीमधील रहिवाश्यांना घेऊन वर्तकनगर प्रभाग समितीला धडक दिली व अधिकार्यांना जाब विचारला असता अधिकाऱ्यांनी सांगितले हेमंत महाले यांनी प्रभाग समितीमध्ये तक्रार केली होती.

परंतू, हेमंत महाले यांच्या तक्रारीची पड़ताळणी न करता कशी काय नोटीस काढली? असा प्रश्न परीषा सरनाईक यांनी उपस्थित केला. त्यावर सहाय्यक आयुक्त गणेश चौधरी यांनी "सदर नोटीस चुकीने पाठविण्यात आली होती" याची कबुली देत दिलगिरी व्यक्त केली व सांगितले की, अथर्व को-ऑप. हौ. सोसायटीला आधिची दिलेली नोटीस रद्द करून ’तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता, तक्रारीमध्ये तथ्य आढळुन आलेले नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सदरची नोटीस रद्द करण्यात येत असून असे नवीन पत्र देण्यात आले असल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले.

सरनाईक यांच्या पाठपुराव्यामुळे इमारतीमधील रहिवाश्यांना न्याय मिळाला. त्याबद्दल रहिवाश्यांनी त्यांचे आभार मानले. गणेश चौधरी यांनी संगनमताने अन्यायकारक दिलेल्या नोटीसीबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलिस स्टेशन व पोलिस आयुक्त यांच्याकडे मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT